शारजा - आयपीलएलच्या सुरुवातीच्या सत्रात धावांचा पाऊस पडणाऱ्या शारजामध्ये आज मोठी धावसंख्या रचण्यात विराट कोहलीच्या आरसीबीला अपयश आले. नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण संथ होत असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूला निर्धारीत २० षटकांत १७१ धावा करता आल्या. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४८ के्ल्या. तर ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत बंगळुरूला समाधानकारक धावसंख्या रचून दिली.
आरोन फिंच आणि देवदत्त पडिक्कलने बंगळुरूला जोरदार सुरुवात करून दिली. मात्र अर्शदीपने पडिक्कलला १८ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मुरुगन अश्विनने फिंचा २० धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. मात्र चौथ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्सला न पाठवता फलंदाजीच्या क्रमात केलेले बदल आरसीबीला नडले.
वॉशिंग्टन सुंदर (१३), शिवम दुबे (२३) आणि एबी डिव्हिलियर्स (२) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीही ४८ धावांवर माघारी परतला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये ख्रिस मॉरिस (नाबाद २५) आणि इसुरू उडाणा ( नाबाद १०) यांनी जोरदार फटकेबाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहा बाद १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली