मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर फिजिओ पॅट्रीक फरहार्ट यांनी भारतीय संघाची साथ सोडली. फरहार्ट हे आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य फिजिओची जबाबदारी पार पाडणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सने त्यांना तीन वर्षांसाठी करारबद्ध केले आहे.
'' इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक आहे. दिल्ली कॅपिटल्सने मागील काही वर्षांत संघात बरेच सकारात्मक बदल केले आहेत आणि त्याचे फळही त्यांना मिळाले. 2019च्या
आयपीएलमध्ये ते तिसऱ्या स्थानी होते. त्यामुळे संघाची वाटचाल योग्य दिशेनं आहे आणि या संघातील खेळाडूंसोबत व सहाय्यक स्टाफसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे,''असे फरहार्ट यांनी सांगितले.
दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज मल्होत्रा म्हणाले की,''दिल्लीसोबत पॅट्रीक काम करणार असल्यानं मी भाग्य समजतो. या पदासाठी त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम कुणी आम्हाला भेटले नसते.'' ऑस्ट्रेलियाचे पॅट्रीक हे 2015-19 या कालावधीत टीम इंडियासोबत होते. शिवाय त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्ससोबतही काम केले आहे.