मुंबई : वानखेडे स्टेडियममध्ये 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेतेपदानंतर भावूक झालेल्या युवराजला महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मारलेल्या मिठीचा तो क्षण अजूनही ताजा वाटतो. भारतीय संघाने श्रीलंकेला नमवून 28 वर्षांचा वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्या वर्ल्ड कप विजयात युवराजचा मोलाचा वाटा होता. कॅन्सरशी झगडणाऱ्या, परंतु कोणालाही त्याची खबर होऊ न देता युवराज त्या स्पर्धेत खेळला होता. आज मुंबई इंडियन्स संघाच्या निमित्ताने पुन्हा त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाऊल टाकले. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर 2011 च्या आठवणींचा प्रसंग चटकन उभा राहिला.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्या स्पर्धेत युवराजने 90.50च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या आणि 15 विकेट्सही घेतल्या होत्या. इंडियन प्रीमिअर लीगच्या (
IPL 2019) 12व्या हंगामाला 23 मार्चला सुरूवात होणार आहे.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स ( आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराजच्या कामगिरीच्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी युवीही तितकाच उत्सुक आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या
आयपीएलसाठी युवराजही कसून तयारी करत आहे.
आयपीएलमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. 2019च्या आयपीएल हंगामात तो मुंबईकडून खेळणार आहे. मुंबई संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटीच्या मुळ किमतीत चमूत दाखल करून घेतले आहे. 2018मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दोन कोटीच्या मुळ किमतीत घेतले होते. परंतु त्याला आठ सामन्यांत केवळ 65 धावा करता आल्या आणि पंजाबने त्याला करारमुक्त केले.
पाहा व्हिडीओ...
मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 24 मार्च मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स मुंबई
28 मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू
30 मार्च किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स मोहाली
3 एप्रिल मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज मुंबई