मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. मुंबईने सलग तीन सामन्यांत विजय मिळवले आहेत. किरॉन पोलार्ड हा त्यांचा हुकुमी एक्का ठरत आहे. त्यात रोहित शर्माच्या पुनरागमनाने मुंबईची बाजू अधिक भक्कम झाली आहे. दुसरीकडे राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सकडून निसटता पराभव पत्करावा लागला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. या सामन्यात मैदानावर उतरण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रमे द्विशतक व शतक पूर्ण केले.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 सामने खेळण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सने शनिवारी नावावर केला. त्यांना सोमरसेटचा 199 सामन्यांचा विक्रम मोडला.
रोहितचा कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून 100 वा सामना आहे. त्याने आयपीएलमध्ये 95, तर चॅम्पियन्स ट्वेंटी-20 मध्ये पाच सामन्यांत मुंबईचे नेतृत्व केले होते.
राजस्थान रॉयल्सला धक्का
आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या राजस्थानला या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले आहे. बेन स्टोक्सच्या जागी संघात इंग्लंडच्या लिएम लिव्हिंगस्टोनला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लिएमने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 43 चेंडूंत 82 धावा चोपल्या होत्या.