Join us

IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला!

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 18:33 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने बाजी मारली. मुंबई इंडियन्सच्या 168 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 128 धावांपर्यंतच मजल मारता आली. पण, दिल्लीचा हा पराभव पंतच्या पचनी पडलेला नाही. त्याने सामना संपल्यानंतर असे कृत्य केले की ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हात मिळवण्यासाठी मैदानावर आले, परंतु त्यावेळी पंतने मुंबईचा कर्णधार रोहितला पाडण्यासाठी त्याच्या पायात पाय घातला. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 168 धावा केल्या. रोहित शर्मा ( 30) आणि क्विंटन डी कॉक ( 35) यांच्या दमदार सुरुवातीनंतर कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंनी अनुक्रमे 37 व 32 धावांची खेळी केली आणि संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा शिखर धवन ( 35) आणि अक्षर पटेल ( 26) वगळता एकही फलंदाज चालला नाही. दिल्लीला 9 बाद 128 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईच्या राहुल चहरने 3 विकेट घेतल्या. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत ( 12) दुसऱ्या स्थानी झेप घेतली. रिषभ पंतला 7 धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले. वर्ल्ड कप साठी निवडण्यात आलेल्या संघात पंतला संधी देण्यात आलेली नाही. 

हिटमॅन रोहित शर्माचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पराक्रम

रोहितने 30 धावांच्या खेळीसह ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसऱा भारतीय खेळाडू ठरला. रोहितला 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 12वी धाव घेताच हा विक्रम केला. रोहितच्या नावावर 8018 धावा आहेत. 2008 पासून रोहितने आयपीएलमध्ये 181 सामन्यांत 4716 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत रोहितच्या नावावर 2331 धावा आहेत. 

टॅग्स :आयपीएल 2019रोहित शर्मारिषभ पंतमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स