जयपूर, आयपीएल 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 2019 सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्स संघाने 7 विकेट राखून विजय मिळवला. मात्र, या पराभवामुळे RCBच्या लीगमधील अडचणी वाढल्या आहेत.
![]()
कोहलीच्या संघाची ही आयपीएलमधील सर्वात लाजीरवाणी सुरुवात म्हणावी लागेल. त्यामुळेच कोहलीचा संघ जेतेपदाच्या शर्यतीतून बाद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, RCBला अजूनही जेतेपदाची संधी आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबई इंडियन्सच्या 2015च्या कामगिरीसारखी पुनरावृत्ती करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सनेही 2015मध्ये सुरूवातीचे चारही सामने गमावले होते, परंतु त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून जेतेपद पटकावले होते.
कोहलीच्या संघावर यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाने निसटता विजय मिळवला, तर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी RCBला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. पण, आयपीएलमध्ये RCBपेक्षा अन्य संघांची लाजीरवाणी सुरुवात झाली होती. दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताचे दिल्ली कॅपिटल्स) यांना सलग सहा सामने गमवावे लागले होते, तर डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स यांना प्रत्येकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. चार किंवा त्यापेक्षा अधिक सलामीचे सामने गमावणारे संघ...
6 सामने - दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2013)
5 सामने - डेक्कन चार्जर्स ( 2012)
5 सामने - मुंबई इंडियन्स ( 2014)
4 सामने - मुंबई इंडियन्स ( 2014)
4 सामने - मुंबई इंडियन्स ( 2008)
4 सामने - मुंबई इंडियन्स ( 2015)
4 सामने - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2019)
बंगळुरूचे आणखी दहा सामने शिल्लक आहेत आणि कोहलीच्या संघासमोर चार वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करणे सहज शक्य नसले तरी कोहलीचा संघ त्यासाठी सज्ज आहे.
![]()