बंगळुरू : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात समोरासमोर असतील, त्यावेळी सर्वांची नजर या दोन खेळाडूंदरम्यान रंगणाऱ्या लढतीवर असेल.
दोन्ही संघ यंदाचा आपला पहिला विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. अशावेळी कोहली व रोहित यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी राहील. बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने चिंतेचा वातावरण होते, पण त्यातून सावरत तो आपली छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या उपस्थितीत मुंबई बंगळुरूच्या कमकुवत बाजूचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. बुमराहची खांद्याची दुखापत मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरली होती, पण तो योग्यवेळी फिट झाला आहे. श्रीलंकेचा लसिथ मलिंगा उपलब्ध असल्याने मुंबईची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. युवराज सिंगच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहील. त्याने दिल्लीविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. मुंबईचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनगनची कोहली, एबी डिव्हिलियर्स व शिमरोन हेटमेयर यांच्याविरुद्ध कडवी परीक्षा राहील.
बंगळुरू संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध गेल्या लढतीत बंगळुरू संघ १७.१ षटकांत ७० धावांत गारद झाला. गोलंदाजीमध्ये लेग स्पिनर यजुवेंद्र चहल पुन्हा एकदा बंगळुरूसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, पण त्याला अन्य गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळायला हवी. (वृत्तसंस्था)
बुमराह तंदुरुस्त
मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला आहे. दिल्लीविरुद्धच्या खांद्याला दुखापत झाल्याने पुढील सामन्यांतील त्याच्या समावेशावर प्रश्न होते. मुंबईने सोमवारी बुमराहची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले, परंतु बंगळुरूत होणाºया सामन्यासाठी तो सोमवारी संघासोबत रवाना झाला नव्हता.