मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात धुमाकूळ माजवणाऱ्या अल्झारी जोसेफला दुखापतीमुळे माघार परतावे लागले. पहिल्या सामन्यातील विक्रमी कामगिरी वगळता जोसेफला उर्वरित सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. त्यात दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील एक गोलंदाज कमी झाला. मात्र, मुंबई इंडियन्सने ही उणीव भरून काढताना दक्षिण आफ्रिकेच्या ब्युरन हेन्ड्रीक्सला करारबद्ध केले आहे. आयपीएलमधील उर्वरित सामन्यात तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अल्झारीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. चेंडू अडवताना अल्झारीने डाईव्ह मारली आणि त्यात त्याने दुखापत करून घेतली. संघातील सूत्रांनी आता जोसेफ आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले. पदार्पणाच्या सामन्यातच अल्झारीने 12 धावांत घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर मुंबईने सनराझर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी बदली खेळाडू म्हणून अल्झारी मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. पहिल्याच सामन्यात त्याने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. तन्वीरने 2008मध्ये 14 धावांत 6 बळी घेतले होते. त्याचा विक्रम १२ वर्षांनी अल्झारीने मोडला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता.
![]()
अल्झारीच्या जागी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या हेन्ड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेकडून दोन वन डे आणि 10 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ट्वेंटी-20 त त्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत आणि 4 बाद 14 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सशी येत्या शुक्रवारी होणार आहे. मुंबई इंडियन्स सध्या 10 सामन्यांत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.