मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल 2019) आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने फिरकीपटू हरभजन सिंग विरुद्ध मुंबई इंडियन्स असाही सामना रंगणार आहे. आयपीएलची दहा सत्र हरभजनने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना म्हणजे भारत-पाकिस्तान सामन्यासारखाच असतो, असे मत भज्जीनं व्यक्त केले.
चेन्नई सुपर किंग्सने 2018च्या लिलावात भज्जीला 2 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अनुभवी खेळाडूंसाठी पैसे मोजणे चेन्नई सुपर किंग्सने नेहमी पसंत केले आहे. त्यांच्या संघातही अनुभवी खेळाडूंचा भरणा जाणवतो.
चेन्नईनं अजून एकही सामना गमावलेला नाही आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स मात्र सहाव्या स्थानावर आहेत. त्यांना दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. भज्जी म्हणाला,''मुंबई इंडियन्स हा पॉप्युलर संघ आहे. त्यामुळे चेन्नई आणि मुंबई समोरासमोर येतात तेव्हा भारत-पाकिस्तान सामन्यासारखाच हा सामना असतो. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना पराभूत करण्यासाठी कंबर कसूनच मैदानावर उतरतात.''
मुंबई आणि चेन्नई यांच्यात वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील 15 वा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील जय-पराजयाची आकडेवारी ही 13-11 अशी आहे. मागील पाच सामन्यांत मुंबईने चारवेळा बाजी मारली आहे.