- हर्षा भोगले
आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘आमने-सामने’ असणे ही शानदार बाब आहे. हे दोन्ही संघ शानदार आहेत, यावर दुमत नाही, पण १४ सामन्यानंतर हे दोन्ही संघ फार थकलेले आहेत. या दोन्ही संघांनी ५ मे रोजी सामना खेळला आहे आणि त्यानंतर प्रवासही केला आहे, हे विसरता येणार नाही.
दोन्ही संघ वेगळ्या परिस्थितीत खेळल्यानंतर चेपाकच्या संथ खेळपट्टीवर खेळतील. चेन्नई संघ अखेरच्या सहापैकी चार सामन्यात पराभूत झालेला आहे. प्रमुख खेळाडू फॉर्मात नाहीत किंवा दुखापतग्रस्त आहेत. संघ मोजक्या मॅच विनर खेळाडूंवर अवलंबून आहे.
पण, हाच चेन्नई संघ अखेरच्या काही लढतींपूर्वी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवित होता, याची आठवण ठेवावी लागेल. मी यापूर्वीही अनेकदा म्हटले आहे की, चेन्नई संघ धोनीच्या साथीने विजयाचा मार्ग शोधतो आणि यात सत्य आहे. आता फाफ ड्युप्लेसिसचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा ठरेल.
चेन्नईला कुठल्या संघाची चिंता करायची असेल तर तो संघ आहे मुंबई. मुंबई संघात प्रत्येक विभागात त्यांना टक्कर देण्याची क्षमता आहे. अलीकडच्या काही सामन्यांमध्ये मुंबईच्या प्रमुख खेळाडूंना सूर गवसला आहे.
त्यांच्याकडे खेळाच्या प्रत्येक विभागात ‘मॅच विनर’ आहे. या सर्व बाबी बाद फेरीच्या टप्प्यात अधिक महत्त्वाच्या ठरतात. २६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्जला आपली ताकद दाखवून दिली आणि त्यामुळे मुंबई संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल.
दरम्यान, चेन्नईची खेळण्याची रणनीती खेळपट्टी व त्याच्या संथपणासोबत जुळवून घेण्याची आहे. जर दवाची अडचण नसेल तर प्रथम फलंदाजी करणे लाभदायक ठरेल कारण दुसऱ्या डावात खेळपट्टी अधिक संथ होत जाईल.
दोन्ही संघाच्या गोलंदाजांमध्ये खेळपट्टीचा लाभ घेण्याची क्षमता आहे, पण माझ्या मते मुंबई इंडियन्सची फलंदाजी अधिक मजबूत आहे.
पण, ही मोठी लढत असून त्यात दडपण अधिक राहील. अशा स्थितीत भाकीत वर्तवताना जोखीम स्वत:ची राहील.