चेन्नई, आयपीएल 2019 : 2 बाद 7 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या मदतीला लोकेश राहुल व सर्फराज खान ही जोडी धावली. या दोघांनी शतकी भागीदारी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. यावेळी लोकेश राहुलला नशिबाची साथही मिळाली.
किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजी मुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या.धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या, तर रायुडूने 15 चेंडूंत 21 धावा केल्या. या जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली.
प्रत्युत्तरात, पंजाबला अवघ्या 7 धावांवर 2 झटके बसले. ख्रिस गेल व लोकेश राहुल समोर असतानाही चेन्नईचा कर्णधार धोनीनं दुसरे षटक हरभजन सिंगला टाकण्यासाठी बोलावले. भज्जीनं हा निर्णय सार्थ ठरवताना गेल व मयांक अग्रवालला बाद केले. सर्फराज आणि राहुल यांच्या संयमी खेळीने पंजाबने 10 षटकांत 2 बाद 71 धावा केल्या. त्यात राहुलच्या 36, तर सर्फराजच्या 29 धावा होत्या. 13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला अपयश आले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही. नशीबाचे पारडे राहुलच्या बाजूने झुकले होते.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/163766/d-j-vu-dhoni-creates-magic-but-bails-still-don-t-fall