मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाने आपला विचार बदलला असून त्याने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेती उद्यापासून सुरू होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी तो मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात तो खेळणार नसल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मलिंगा मायदेशात परतणार असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट मंडळाने मंगळवारी दिली होती, परंतु मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. त्याने संपूर्ण आयपीएलमधून माघार घेतली आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने श्रीलंका क्रिकेट मंडळाने 4 ते 11 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्रमुख खेळाडूंना सहभाग घेण्यास सांगितले होते. त्यानुसार मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार होते, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) मध्यस्तीनंतर श्रीलंकन मंडळाने मलिंगाला खेळण्याची परवानगी दिली होती.पण, मलिंगाने आपलं मत बदललं आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख अशांथा डी मेल यांनी सांगितले की,''मलिंगा उद्यापर्यंत श्रीलंकेत दाखल होईल आणि स्थानिक स्पर्धेत तो खेळणार आहे. त्याला या स्पर्धेत खेळायचे होते. मागील आठवड्यात त्याला आम्ही आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती, परंतु त्याला स्थानिक स्पर्धेत खेळायचे आहे."
दरम्यान, मलिंगाने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो वन डे क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दक्षिण आफ्रिकेनंतरच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातील पराभवानंतर मलिंगाने ही घोषणा केली. तो म्हणाला,''वर्ल्ड कपनंतर माझी कारकिर्द संपुष्टात येणार आहे. मला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे आणि त्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईन.''