Join us

IPL 2019 KXIP vs KKR : शुबमनची घरच्या मैदानावर आतषबाजी, कोलकाताचा विजय 

IPL 2019 KXIP vs KKR: कोलकाताने प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 23:35 IST

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : घरच्या मैदानावर खेळताना शुबमन गिलने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या समीप आणले. लीन आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावा केल्या, तर गिल व रसेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर कोलकाताने शुक्रवारी 7  विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. शुबमनने 49 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 65 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने 9 चेंडूंत नाबाद 21 धावांची खेळी केली.

 

महत्त्वाच्या सामन्यात ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांना अपयश आल्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब अडचणीत सापडला होता. मात्र, निकोलस पूरण आणि मयांक अग्रवाल यांनी संघाला सुस्थितीत आणले. त्यांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 184 धावांचे आव्हान ठेवले. सॅम कुरन आणि मनदीप सिंग यांनी अखेरच्या षटकात चांगलीच फटकेबाजी केली. कुरनने 23 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने 24 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या. पूरण आणि अग्रवाल या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची 69 धावांची भागीदारी नितीश राणाने तोडली. 27 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 48 धावा करणाऱ्या पूरणला त्याने बाद केले. त्यानंतर अग्रवालकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु नरीनने त्याला धावबाद केले. अग्रवाल 26 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 36 धावा करून माघारी परतला. अखेरच्या षटकात कुरनने चांगलीच फटकेबाजी केली. ख्रिस लीन आणि शुबमन गिल यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. लीनने पंजाबच्या गोलंदाजांना धुतले. त्यामुळे कोलकाताने पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या, परंतु त्यांना लीनची विकेट गमवावी लागली. अँड्य्रु टायने त्याला बाद केले. लीनने 22 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 46 धावा केल्या. त्यानंतर रॉबीन उथप्पा आणि गिल या जोडीनं चांगली खेळी करताना संघाला 10च्या सरासरीनं धावा चोपून दिल्या. शतकी धावा केल्यानंतर पंजाबच्या कर्णधाराने उथप्पाला बाद केले. उथप्पाने 22 धावा केल्या. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गिलने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 14 धावांवर असताना आंद्रे रसेलला जीवदान मिळाले. टायच्या गोलंदाजीवर अग्रवालने सोपा झेल सोडला. त्याचा भूर्दंड पंजाबला भरावा लागला. मात्र, 15व्या षटकात रसेलला मोहम्मद शमीनं माघारी पाठवले. त्याने 14 चेंडूंत 24 धावा केल्या. शुबमन एका बाजूने दमदार खेळ करत होता. त्याच्या फटकेबाजीनं कोलकाताचा विजय पक्का केला. कर्णधार दिनेश कार्तिकनेही सावध खेळ करताना शुबमनला साथ दिली. 

टॅग्स :आयपीएल 2019किंग्ज इलेव्हन पंजाबकोलकाता नाईट रायडर्स