मोहाली, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सने फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. ड्यू प्लेसिसचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. सॅम कुरनच्या अप्रतिम यॉर्करने ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. ड्यू प्लेसिसने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 96 धावा केल्या.
![]()
नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत प्ले ऑफचे स्वतःचे दरवाजे बंद करून घेतले. पंजाबला प्ले ऑफच्या आशा जीवंत राखण्यासाठी या सामन्यात 251+ धावांच्या फरकाने किंवा चेन्नईला 100च्या आत गुंडाळावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना कोलकाताच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. पण, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन त्यांनी प्ले ऑफचा मार्ग स्वतः बंद केला आहे. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमधील ही पॉवर प्लेमधील पाचवी सर्वोत्तम कामगिरी आहे. सॅम कुरनने पाचव्या षटकात वॉटसनला ( 7) त्रिफळाचीत केले. पण, फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचा डाव सावरला. चेन्नईने 9 षटकांत 1 बाद 67 धावा केल्या.
ड्यू प्लेसिस आणि रैना या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ड्यू प्लेसिसने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ड्यू प्लेसिस आणि रैना यांनी 67 धावांच्या भागीदारीचा पल्ला ओलांडताच एक विक्रम नावावर केला. पंजाबविरुद्ध यंदाच्या मोसमात चेन्नईकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पाठोपाठ रैनाने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 98 धावांच्या भागीदारीचा पल्ला पार करताच एक विक्रम नावावर केला.
कुरनने ही जोडी तोडली. रैना 38 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. त्यानंतर ड्यू प्लेसिस आणि महेंद्रसिंग धोनी यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. अंबाती रायुडू व केदार जाधव स्वस्तात माघारी परतले.