मोहाली, आयपीएल 2019 : अटीतटीच्या लढतीत अखेर पंजाबने राजस्थानवर मात केली. पंजाबने राजस्थानपुढे 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग राजस्थानला करता आला नाही. या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 12 धावांनी मात केली आणि या विजयासह पंजाबने चौथे स्थान पटकावले आहे. पण, या विजयानंतरही पंजाबच्या गोटात चिंता वाढवणारी बातमी धडकली आहे. मोइजेस हेन्रिक्स आणि मुजीब उर रहमान या पंजाबच्या खेळाडूंना दुखापत झाली आहे. हेन्रिक्सला मंगळवारी पंजाबकडून पदार्पण करायचे होते, परंतु मॅचपूर्वी सराव सत्रातच त्याला दुखापत झाली. तर मुजीबला सामन्यात खांद्याला मार लागला.
पंजाबच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरुवात केली. जोस बटलर फटकेबाजी करत असला तरी त्याला 23 धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पण अर्धशतकानंतर त्रिपाठीला मोठी खेळी साकारता आली नाही. त्रिपाठीने 45 चेंडूंत 50 धावा केल्या. त्रिपाठी बाद झाल्यावर राजस्थानचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. त्यांना 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली.