Join us

IPL 2019 : केदार जाधव उर्वरित IPLला मुकणार; CSKच्या प्रशिक्षकांचे संकेत 

IPL 2019: केदार जाधवच्या वर्ल्ड कप सहभागावर चिंता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 08:36 IST

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स संघाने सातत्यपूर्ण खेळ करत क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान पक्के केले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईला हार मानावी लागली, परंतु त्यांनी 'टॉप टू' मधील आपले स्थान कायम राखले आहे. क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईला मुंबई इंडियन्स या तगड्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. पण या सामन्यात त्यांना अष्टपैलू खेळाडू केदार जाधवशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. जाधव या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोहाली येथे झालेल्या साखळी गटातील अखेरच्या सामन्यात जाधवच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित आयपीएलमधून माघार घेण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावरजाधवला झालेली दुखापत ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. "केदारच्या खांद्याचा एक्स-रे आज काढण्यात येईल. त्याची दुखापत गंभीर नसावी अशी आशा व्यक्त करतो. उर्वरीत सामन्यात तो खेळेल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने त्याने लवकरात लवकर बरे व्हावे. प्रार्थना करा की त्याची दुखापत गंभीर नसूदे," असे CSK चे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले. 

पंजाबविरुद्धच्या सामन्यात 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप स्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी जाधवने डाइव्ह मारली. जाधवने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. त्याला बदली खेळाडू म्हणून आलेल्या मुरली विजयने पूरणचा सोपा झेल सोडला आणि चेन्नईची सामन्यात पुनरागमन करण्याची संधी हुकली. 

भारतीय संघ व्यवस्थापनाने जाधवची दुखापत गंभीर नसावी अशी आशा व्यक्त केली आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दुखापतीमुळे जाधवने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यास निवड समिती अंबाती रायुडू, ऱिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाचा विचार करू शकतात.

टॅग्स :केदार जाधवआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाबवर्ल्ड कप २०१९