RCB हा रथी-महारथींचा संघ, पण सगळेच कागदावरचे वाघ; विजय मल्ल्याने काढली 'विकेट'
मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी निराशाजनक झाली. बंगळुरूने आयपीएलचा निरोप विजयाने घेतला असला तरी त्यांना गुणतालिकेत तळावरच समाधान मानावे लागले. बंगळुरूच्या या कामगिरीवर संघाचा माजी मालक आणि सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
बंगळुरून घरच्या मैदानावर खेळलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट राखून विजय मिळवला. हैदराबादचे 176 धावांचे लक्ष्य बंगळुरूने 19.2 षटकांत 6 विकेटच्या मोबदल्यात पार केले. केन विलियम्सनने 70 धावांची खेळी करून हैदराबादला 7 बाद 175 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात सिमरोन हेटमायर ( 75) आणि गुरकिरत मन सिंग ( 65) यांनी बंगळुरूला विजय मिळवून दिला. तरीही बंगळुरूला 11 गुणांसह तळावरच समाधान मानावे लागले.
या संपूर्ण स्पर्धेत बंगळुरूच्या गोलंदाजांना अपयश आले. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून मिळालेल्या धक्क्यानंतर ( सर्वबाद 70) बंगळुरूच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली. मात्र, गोलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. फलंदाजीतही विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावरीच बंगळुरूचा संघ फार अवलंबून असल्याचे जाणवले. अखेरच्या सामन्यानंतर कोहली व डिव्हिलियर्स यांनी आयपीएलच्या पुढील हंगामात दमदार कामगिरी करण्याचे आश्वासन चाहत्यांना दिले. त्याचवेळी त्यांनी सर्वांचे आभारही मानले. मात्र, माजी मालक मल्ल्याने सोशल मीडियावरून नाराजी प्रकट केली. त्याने लिहिले की,''जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा हा संघ आहे, परंतु हे सर्व कागदावरच वाघ ठरले. ''