जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी आजचा दिवस फार चांगला राहिला नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने क्विंटन डी कॉकचा एक आणि हार्दिक पांड्याचे दोन झेल सोडले. त्यामुळे तो स्वतःवर प्रचंड निराश दिसला, परंतु अखेरच्या षटकात त्याने हार्दिकला बाद करून चुकांची भरपाई केली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले.
पाहा व्हिडीओ...https://www.iplt20.com/video/174573/jofra-s-forgetful-day-in-the-outfield?tagNames=indian-premier-league
17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने मुंबईच्या हार्दिक पांड्याचा सोपा झेल सोडला. हार्दिकने टोलावलेला चेंडू आर्चरच्या हातात सहज झेपावला होता, परंतु तो हातात राखण्यात आर्चरला अपयश आले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर किरॉन पोलार्डने षटकार खेचला. पण जयदेव उनाडकटने ही कसर भरून काढली, पुढच्याच चेंडूवर उनाडकटने पोलार्डचा त्रिफळा उडवला. 19व्या षटकात पुन्हा आर्चरने पांड्याला जीवदान दिले. उनाडकटच्या गोलंदाजीवरच आर्चरने झेल सोडला आणि पांड्याने पुढच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. आर्चरने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला पायचीत केले. हार्दिकने 15 चेंडूंत 23 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ...https://www.iplt20.com/video/174585/jofra-archer-finally-redeems-himself?tagNames=indian-premier-league