चेन्नई, आयपीएल 2019 : किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर चेन्नई सुपर किंग्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंजाबचा कर्णधार आर अश्विनने दिलेल्या तीन धक्क्यातून सावरण्याची संधीच चेन्नईला मिळाली नाही. पण, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजी मुळे चेन्नईला निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 160 धावा करता आल्या. धोनीने 23 चेंडूंत 37 धावा केल्या, तर रायुडूने 15 चेंडूंत 21 धावा केल्या. या जोडीनं अर्धशतकी भागीदारी केली.
वॉटसन आणि ड्यू प्लेसिस यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 6 षटकांत बिनबाद 54 धावा केल्या. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आर अश्विनने चेन्नईचा सलामीवीर वॉटसनला माघारी पाठवले. वॉटसनने 24 चेंडूंत 26 धावा केल्या आणि त्यात 3 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. वॉटसन बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली. त्यांना 10 षटकांत 1 बाद 71 धावाच करता आल्या. पहिल्या सहा षटकांत 54 धावा करणाऱ्या चेन्नईला पुढील 4 षटकांत केवळ 18 धावाच करण्यात यश आले. ड्यू प्लेसिसने 33 चेंडूंत 50 धावा केल्या, त्यात 2 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. ड्यू प्लेसिसचे आयपीएलमधील हे दहावे अर्धशतक ठरले. पण, अश्विनने त्याला माघारी पाठवले. ड्यू प्लेसिस 38 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा करत माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर सुरेश रैनालाही अश्विनने त्रिफळाचीत केले. रैनाने 20 चेंडूंत 17 धावा केल्या. अश्विनने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट घेतल्या.