Join us

IPL 2018 : 'हिरो टू झीरो'... रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम  

रोहित शर्माचा 'हा' विक्रम गतविजेत्या मुंबई इंडियन्सला भलताच महागात पडला असून त्यांच्या 'प्ले-ऑफ'च्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्यात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:00 IST

Open in App

मुंबईः आयपीएलची तीन जेतेपदं पटकावणारा एकमेव कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरलाय. अर्थात, या विक्रमामध्ये मुंबई संघातील ईशान किशनही त्याचा भागीदार आहे. या जोडीचे हे तीन 'भोपळे' गतविजेत्या मुंबई इंडियन्सला भलतेच महागात पडले असून त्यांच्या 'प्ले-ऑफ'च्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्यात. 

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या रविवारच्या 'करो या मरो' सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट गेली होती. त्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. याआधीही, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रोहितला भोपळा फोडता आला नव्हता. तसंच, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसमोरही हा 'हिटमॅन' फ्लॉप ठरला होता. 

कॅप्टन नं. २

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. दिल्ली डेअरडेविल्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर या यादीत अव्वल स्थानी आहे. तो १० वेळा शून्यावर बाद झालाय. दुसऱ्या स्थानावर रोहितसोबत अॅडम गिलक्रिस्ट आणि शेन वॉर्नही आहेत. या तिघांना सात वेळा भोपळा फोडता आला नव्हता. 

राजस्थानचं एक पाऊल पुढे

दरम्यान, आक्रमक सलामीवीर जोस बटलरच्या (९४*) तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. त्यामुळे राजस्थान पाचव्या स्थानावर पोहोचलं आहे आणि त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा कायम आहेत. याउलट, मुंबईची सहाव्या स्थानी घसरण झाली असून पुढील वाटचाल बिकट बनली आहे. मुंबईने दिलेल्या १६९ धावांचे आव्हान राजस्थानने केवळ १८ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं.

टॅग्स :आयपीएल 2018रोहित शर्मामुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स