Join us  

IPL 2018 PLAY OFF: RCB, पंजाबला अजूनही प्ले-ऑफचा 'मौका', कोण मारणार 'चौका'... असं आहे आकड्यांचं गणित

प्ले ऑफमधील दोन स्थानांसाठी पाच संघांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 3:07 PM

Open in App

मुंबई: चुरशीच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. मात्र या पराभवामुळे पंजाबचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. मुंबई सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात 12 गुण आहेत. चेन्नई आणि हैदराबादच्या संघानं प्ले ऑफमधील स्थान नक्की केलं आहे. आता उरलेल्या दोन स्थानांसाठी पाच संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता प्ले ऑफमधील समीकरण असं असेल-

कोलकाता नाईट रायडर्स: 13 सामने, 7 विजय, 6 पराभव, 14 गुण, नेट रन रेट -0.091कोलकाता नाईट रायडर्सचे सध्या 13 सामन्यांमध्ये 14 गुण झाले आहेत. कोलकात्याचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईकडून 102 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकात्यानं जोरदार पुनरागमन केलं. कोलकात्यानं पंजाब आणि राजस्थानला पराभूत केल्यानं कोलकात्याचा प्ले ऑफचा मार्ग थोडा सुकर झाला आहे. मात्र कोलकात्याचं नशीब मुंबई (+0.384) आणि बंगळुरुच्या (+0.218) कामगिरीवर अवलंबून आहे. कारण कोलकात्याचा नेट रन रेट (-0.091) मुंबई आणि बंगळुरुपेक्षा कमी आहे. 

मुंबई इंडियन्स: 13 सामने, 6 विजय, 7 पराभव, 12 गुण, नेट रन रेट +0.384 मुंबईच्या संघानं बुधवारी पंजाबचा पराभव करत प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मात्र अद्याप मुंबईचा संघर्ष संपलेला नाही. प्ले ऑफमध्ये थेट प्रवेश करायचा असल्यास शेवटच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करावं लागेल. हा सामना गमावल्यास सगळा खेळ नशिबाचा असेल. मग नेट रन रेटच्या आधारे मुंबईसाठी प्ले ऑफचं दार उघडू शकतं. राजस्थान, पंजाब आणि बंगळुरु या सर्व संघांचे 12 गुण झाल्यास आणि त्यात मुंबईचा नेट रन रेट जास्त असल्यास मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळेल. अशी परिस्थिती तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा बंगळुरुचा संघ दोनपैकी एकच सामना जिंकेल आणि इतर दोन्ही संघ त्यांचे शेवटचे सामने हरतील. अशी परिस्थिती निर्माण होणं अतिशय कठीण आहे.

राजस्थान रॉयल्स: 13 सामने, 6 विजय, 7 पराभव, 12 गुण, नेट रन रेट -0.403 स्पर्धेच्या सुरुवातीला वाईट कामगिरी करणाऱ्या राजस्थाननं नंतर जोरदार पुनरागमन केलं. मुंबईनं पंजाबचा पराभव केल्यानं सध्या राजस्थानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. राजस्थाननं त्यांच्या अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मोठा पराभव केल्यास त्यांना प्ले ऑफमध्ये संधी मिळू शकेल. मात्र हीदेखील फक्त एक शक्यता आहे. मुंबईनं दिल्लीला पराभूत केल्यास मुंबईच्या खात्यात 14 गुण जमा होतील. मुंबई (12 गुण, नेट रन रेट +0.384) आणि कोलकाता (14 गुण, नेट रन रेट -0.091) यांची कामगिरी राजस्थानपेक्षा (नेट रन रेट (-0.403) चांगली आहे. 

किंग्स इलेव्हन पंजाब: 13 सामने, 6 विजय, 7 पराभव, 12 गुण, नेट रन रेट -0.490ख्रिस गेल, लोकेश राहुल, अँड्रू टाय यांचा समावेश असलेल्या पंजाबनं स्पर्धेची सुरुवात अतिशय झोकात केली होती. मात्र गेल्या 4 सामन्यांमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवांमुळे आता हा संघ प्ले ऑफसाठी झगडताना दिसतो आहे. आता त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश नशिबावर अवलंबून आहे. कारण पंजाबचा नेट रन रेट अतिशय खराब आहे. पंजाबचा शेवटचा सामना चेन्नई विरुद्ध होणार आहे. हा सामना पंजाबसाठी सोपा नसेल. हा सामना जिंकल्यावरही पंजाबचा प्ले ऑफमधील प्रवेश जर-तर वर अवलंबून असेल. मुंबई, राजस्थान आणि बँगलोर हे संघ पराभूत झाले, तरच पंजाबला प्ले ऑफचं तिकीट मिळेल. 

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर: 12 सामने, 5 विजय, 7 पराभव, 10 गुण, नेट रन रेट +0.218मुंबई प्रमाणेच चांगला नेट रन रेट ही बँगलोरच्या संघासाठी दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही विराट कोहलीच्या संघाला दोन्ही (हैदराबाद आणि राजस्थान) सामने जिंकावे लागतील. इतकंच नव्हे, तर कोलकात्याच्या संघाला किमान एका सामन्यात पराभूत व्हावं लागेल. कारण कोलकात्यानं विजय मिळवल्यास, त्यांचे 16 गुण होतील आणि त्यांना प्ले ऑफचं तिकीट मिळेल. अशा परिस्थितीत प्ले ऑफमधील केवळ एकच स्थान शिल्लक राहील. ज्यासाठी बँगलोर आणि मुंबईमध्ये स्पर्धा असेल. बँगलोरनं पुढील दोन्ही सामने जिंकल्यास आणि मुंबईनं शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी 14 गुण होतील. मग अशावेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. सध्या मुंबई (12 गुण, नेट रन रेट +0.384) नेट रन रेटच्या बाबतीत बँगलोरच्या पुढे आहे. याशिवाय शेवटचा सामना जिंकल्यावर मुंबईचा नेट रन रेट आणखी सुधारेल. 

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्सकिंग्ज इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्स