Join us

IPL 2018: चेन्नईतील मैदानावर 'कावेरीचे पाणी'; सामने इतरत्र खेळवले जाणार

कावेरी नदीच्या पाणी वाटपाचा वाद वाढल्यानं निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:03 IST

Open in App

चेन्नई: कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका आता आयपीएलला बसताना दिसत आहे. चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने इतरत्र खेळवण्यात येणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कावेरी पाणी वाटपावरुन गेले काही दिवस तामिळनाडूतील वातावरण तापलेलं आहे. त्यामुळेच चेन्नईतील सामने इतरत्र खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं वृत्त एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएलचे सामने होतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कावेरी नदीच्या पाणी वाटपाचा वाद सुरू असल्यानं बीसीसीआयनं इथे होणारे सामने इतरत्र खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी चेन्नईत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा सामना सुरु होता. यावेळी काही प्रेक्षकांनी खेळाडूंच्या दिशेने बूट भिरकावले. या प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या पार्श्वभूमीवर या प्रेक्षकांनी बूट भिरकावल्याची माहिती चौकशीतून समोर आली. विशेष म्हणजे स्टेडियममध्ये ४ हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असतानाही हा प्रकार घडला. त्यामुळेच बीसीसीआयने सुरक्षेचा उपाय म्हणून चेन्नईत होऊ घातलेले आयपीएलचे सामने इतरत्र खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. 

चेपॉक मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील सात सामने होणार होते. मात्र आता हे सर्वच सामने इतरत्र खेळवले जातील. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान झालेल्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात चेन्नईचा संघ क्षेत्ररक्षण करताना आठव्या षटकात मैदानावर बूट फेकण्यात आले. लाँग ऑनला उभ्या असलेल्या रवींद्र जाडेजाच्या दिशेनं हा बूट फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतलं होतं. 

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सचेन्नईक्रिकेट