India Masters vs Sri Lanka Masters, 1st Match एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं श्रीलंकेविरुद्धच्या लढतीनं इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी-२० स्पर्धेला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानात रंगलेल्या इंडिया मास्टर्स विरुद्ध श्रीलंका मास्टर्स यांच्यातील सामन्यात रॉबिन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अंबाती रायडूच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात सचिनच्या भात्यातून बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. वयाच्या ५१ व्या वर्षीही त्याच्या भात्यातून निघालेला कव्हर ड्राइव्ह चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडणारा असा होता.
सचिनच्या परफेक्ट कव्हर ड्राइव्हसह ड्रेसिंग रुममध्ये बसलेला व्हिडिओ होतोय व्हायरल
श्रीलंकेचा माजी क्रिकेटर आणि दिग्गज जलदगती गोलंदाज इसुरु उडाना घेऊन आलेल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सचिन तेंडुलकरच्या भात्यातून कडक कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवरही सचिननं पुल शॉटवर चौकार मारला.
सचिनला पुन्हा मैदानात खेळताना पाहून चाहत्यांचा आनंद अगदी गगनाला भिडला होता. सोशल मीडियावर सचिनच्या कडक कव्हर ड्राइव्हचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. मास्टर ब्लास्टरनं सुरुवात दमदार केली. पण दोन चौकाराच्या मदतीने १० धावा काढून तो तंबूत परतला. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
सचिनची क्रेझ कायम
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिनची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचा सीन पाहायला मिळाला. अजूनही क्रिकेट हा आमचा धर्म अन् सचिन आमचा देव या आशयाची फलकबाजी करत चाहत्यांनी मास्टर ब्लास्टरवरील प्रेम दाखवून दिले.