Join us  

मुंबईत क्रीडा संकुलाच्या निमित्तानं भाजप-काँग्रेस एकत्र! बोरीवलीच्या चिकूवाडीत साकारणार आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रीड़ा संकुल

क्रीडा मंत्र्यांच्या भेटी दरम्यान उत्तर मुंबईचे भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 5:57 PM

Open in App

मनोहर कुंभेजकरमुंबई - बोरीवलीच्या चिकूवाडीत आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रीड़ा संकुल भविष्यात साकारणार आहे. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या भेटी दरम्यान आणि सदर क्रीडांगणाच्या विकासासाठी उत्तर मुंबईचे भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आल्याचे अनोखे दर्शन येथे घडले.

बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडी परिसरातील कित्येक वर्षे रखडलेल्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम या महिन्यात सुरु करण्यात येईल असे ठोस आश्वासन महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतेच बोरिवली येथे दिले. त्यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या ठिकाणी भेट दिली होती, त्यावेळेस त्यांनी हे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील तसेच येथील भाजपा व काँग्रेसचे पदाधिकारी येथील क्रीडांगणाच्या विकास कामासाठी एकत्र आले होते.

बोरिवली येथील १३ एकर भूखंडावर प्रमोद महाजन क्रीडा संकुल उभारण्याची मागणी आणि संकल्पना खासदार गोपाळ शेट्टी यांची आहे.. ह्या साठी वेळोवेळी संबंधित मंत्रालय आणि अधिकारी तसेच मंत्री महोदयांना भेटून निवेदन दिले होते. कोरोना काळात सुद्धा क्रीडामंत्री सुनील केदार यांना भेटून खासदार  शेट्टी यांनी प्रमोद महाजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाला गती मिळण्यास्लठी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती.

सदर 13 एकरच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय स्तराचे इनडोर खेळ संकुल, फुटबॉल मैदान, तरण तलाव, खेळाडूंसाठी हॉस्टेल, जॉगिंग ट्रॅक इत्यादी निर्माण करण्याची कल्पना आहे.तर पहिला टप्प्यात जॉगिंग ट्रेक, मुख्य द्वार आणि उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे

 सुनील केदार  म्हणाले की, आजच्या नवीन पिढीसाठी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या संदर्भात पाहणी करण्याकरिता, या राज्याचा क्रीडामंत्री म्हणून मी येथे आलेलो आहे. क्रीडा क्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये स्त्री पुरुष समानता असते, जातीभेदाचे राजकारण होत नाही, गरीब-श्रीमंत हा भेद राहत नाही. फक्त गुणवत्तेच्या जोरावर माणूस पुढे जातो. या चिकूवाडी विभागातील रहिवाश्यांची आणि येथील स्थानिक नेत्यांची मागणी होती की, या विभागात शासनातर्फे प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, त्यानुसार हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यात या क्रीडा संकुलाचे काम सुरु करण्यात येईल. यासाठी या विभागातील रहिवाशांनी, पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी एकत्र येऊन या कामामध्ये सहकार्य करावे, एवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

लवकरच दोन टप्प्यात सदर क्रीडा संकुलाचे विकास कार्य सुरू होत असून या महिन्यात पहिल्या टप्यात भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार शेट्टी व भूषण पाटील यांनी दिली. क्रीडामंत्री सुनील केदार यांचे खासदार गोपाळ शेट्टी आणि भूषण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या सोबत स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, पोयसर जिमखान्याचे  करुणाकर शेट्टी,तसेच काँग्रेसच्या उत्तर मुंबई महिला जिल्हाध्यक्षा प्रगती राणे, मुंबई काँग्रेसचे सचिव मनोज नायर,उत्तर मुंबई भाजपा पदाधिकारी डॉ.योगेश दुबे, दिलीप पंडित, संतोष सिंह, युनूस खान, नितीन प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबईकाँग्रेसगोपाळ शेट्टीभाजपाबोरिवली