घरच्या मैदानावर झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं जबरदस्त कामगिरी करत पहिल्यांदाच विजेतेपदावर आपलं नाव कोरून इतिहास घडवला आहे. मधल्या काही लढतीत अडखळल्यानंतर भारतीय महिला संघाने ऐनवेळी सांघिक कामगिरी उंचावत हे यश मिळवलं. भारतीय महिला संघाने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशात मोलाचा वाटा आहे तो संघाचे प्रशिक्षक असलेल्या माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांचा.
मुंबईचा उत्कृष्ट फलंदाज असलेल्या अमोल मुजुमदार यांना भारतीय संघातून खेळण्याची संधी कधी मिळाली नाही. मात्र आता प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावताना मुजुमदार यांनी महिला संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शांत स्वभाव, संयमी नेतृत्वशैली आणि खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण करत अमोल मुजुमदार यांनी संघाला हे यश मिळवून दिलं. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी अमोल मुजुमदार यांनी स्वीकारली होती. तेव्हापासून त्यांनी भारतीय संघामध्ये स्थैर्य आणलं. तसेच संघाची निवजड आणि नेतृत्वाबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना आपल्या कामाच्या माध्यमातून उत्तर दिलं.
अमोल मुजुमदार यांना भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे जेव्हा त्यांची भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती तेव्हा काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र अमोल मुजुमदार यांनी या सर्व प्रश्नांना आपल्या कामाच्या माध्यमातून उत्तर दिले. तसेच अनुभव हा केवळ आंततरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानेच येतो असं नाही हे दाखवून दिले.
अमोल मुजुमदार यांची प्रशिक्षण देण्याची पद्धत ही पारंपरिक प्रशिक्षकांपेक्षा जरा वेगळी आहे. ते मोठमोठी भाषणं किंवा भावनिक गोष्टींवर भर देत नाहीत. तर खेळाडूंना शांत राहून आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करतात. या वर्ल्डकपमध्येही साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर संघावर दबाव असतानाही अमोल मुजुमदार यांनी ड्रेसिंग रूममध्ये शांतता कायम राखली. तसेच त्यांच्या या रणनीतीचा उत्तम परिणाम स्पर्धेच्या उत्तरार्धात दिसून आला.
अमोल मुजुमदार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसले तरी त्यांच्याकडे देशांतर्गत आणि प्रथमश्रेणी क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्यांनी १७१ प्रथमश्रेणी सामन्यांत ११ हजारांहून अधिक धावा काढल्या आहेत. तसेच त्यात ३० हून अधिक शतके आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ११३ लिस्ट ए एकदिवसीय सामन्यात ३ हजारांहून अधिक धावा काढल्या आहेत. त्यात ३ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच एमोल मुजुमदार यांनी १४ टी-२० सामन्यात १७४ धावा काढल्या आहेत.