नवी दिल्ली : भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात लोळवून मिळविलेला कसोटी विजय उल्लेखनीय असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने म्हटले आहे. पहिल्या कसोटीत ३६ धावात गारद झाल्यानंतर तसेच अनेक खेळाडू जखमी असताना भारताने यजमान संघावर २-१ ने मिळविलेला विजय महत्त्वपूर्ण ठरतो, असे विलियम्सनने स्पोर्ट्स टुडेला सांगितले. तो म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात विजय साजरा करणे नेहमी आव्हानात्मक असते. भारताने अनेक समस्यांवर मात करीत ज्या आव्हानांचा यशस्वी सामना केला, ते प्रशंसनीय म्हणावे लागेल. गाबामध्ये खेळलेल्या भारतीय संघाकडे सरासरी सात किंवा आठ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेले खेळाडू होते. अनुभवहीन गोलंदाजीनंतरही भारताने ऐतिहासिक विजय नोंदविला होता.’