नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना अहमदाबादच्या (गुजरात) नवनिर्मित मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणार आहे. येथे चार सामन्यांच्या मालिकेतील अन्य एका सामन्याव्यतिरिक्त पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिकाही खेळली जाणार आहे.
बीसीसीआयने फेब्रुवारी-मार्च (२०२१) महिन्यात इंग्लंडच्या भारत दौऱ्यात रोटेशन नीतीनुसार कसोटी मालिकेतील अन्य दोन सामन्याचे यजमानपद चेन्नईला सोपविले आहे तर, तीन सामन्याची वन-डे मालिका पुणे येथे खेळली जाणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी गुजरात क्रिकेट संघटनेच्या इन्डोर अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मोटेरामध्ये दिवस-रात्र कसोटीच्या यजमानपदाची घोषणा केली. गेल्या वर्षी ईडन गार्डनमध्ये बांगला देशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यानंतर भारतात गुलाबी चेंडूने खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना असेल
.
बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले,‘इंग्लंड संघ सध्याच्या स्थितीत (कोविड १९ महामारी) पूर्ण भारताचा दौरा करणार नाही. केवळ तीन शहरांमध्ये बीसीसीआय जैवसुरक्षित वातावरण (बायो-बबल) वातावरणनिर्मिती करणार आहे. दोन कसोटी व पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. उर्वरित दोन कसोटी सामने चेन्नई व तीन वन-डे पुणे येथे खेळले जातील.
चेन्नई व पुणे या स्थळांची निवड करण्याबाबत बोलताना सूत्राने सांगितले,‘आमच्या रोटेशन नीतीनुसार पुणे व चेन्नई या शहरांना फार पूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद मिळायला हवे होते. या मालिकेसह त्यांना राखीव असलेल्या सामन्यांचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळेल. ’सूत्राने पुढे सांगितले,‘बीसीसीआयच्या संचालन समितीने सखोल विचार केल्यानंतर हे तीन स्थळ संघांसाठी बायो-बबल तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.’
इंग्लंड दौऱ्याचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आयपीएलचे (इंडियन प्रीमिअर लीग) देशात आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मानल्या जात आहे. कोविड-१९ मुळे आयपीएलचे यापूर्वीचे पर्व यूएईमध्ये खेळविण्यात आले.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डचे (ईसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, ‘बीसीसीआयने तीन स्थळांवर (चेन्नई, अहमदाबाद व पुणे) जैव सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आम्हाला खुशी झाली. अहमदाबाद येथील शानदार सरदार पटेल स्टेडियममध्ये खेळण्याच्या शक्यतेमुळे या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. येथील वातावरण खेळाडू व व्यवस्थापन दोघांसाठी आकर्षक असेल.’
दौरा कार्यक्रम
कसोटी मालिका
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद
टी-२० (सर्व सामने अहमदाबाद)
१) १२ मार्च पहिला टी-२०
२) १४ मार्च दुसरा टी-२०
३) १६ मार्च तिसरा टी-२०
४) १८ मार्च चौथा टी-२०
५) २० मार्च पाचवा टी-२०
वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे