India's likely XI for 1st Test vs England ( Marathi News ) - भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका उद्यापासून सुरू होत आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली याने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटींतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी रजत पाटीदार याची निवड झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी लोकेश राहुल यष्टिरक्षकाच्या भूमिकेत नसेल हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर KL Rahul खेळणार हे निश्चित आहे. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये २ जागांसाठी चार जणांमध्ये स्पर्धा रंगली आहे.
लोकेश राहुल यष्टिरक्षण करणार नसल्याने केएस भरत व ध्रुव जुरेल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल, हे पक्कं आहे. भरतने भारत अ संघाकडून खेळताना मागील आठवड्यात इंग्लंड लायन्सविरुद्ध महत्त्वाचे शतक झळकावले होते. त्यामुळे त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे पक्के आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलनंतर तो कसोटी संघात पुनरागमन करत आहे. त्याला ५ कसोटींत काही फार चांगली कामगिरी करता आलेली नसली तर जुलेरच्या आधी त्याच्या नावाचा विचार होईल.

लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. रोहित शर्मा व युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल हे सलामीला येतील, तर शुबमन गिलकडे तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी असेल. गिल हा २०२२-२३ मधील बीसीसीआयच्या सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराचा मानकरी आहे. पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळताना दिसेल. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यासह रवींद्र जडेजा व आर अश्विन यांची निवड निश्चित आहे. पण, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हा पेच आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज