मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या लेकींनी फायनल बाजी मारली. महिला अंडर १९ संघानं सलग दुसऱ्यांदा क्रिकेट जगतातील मोठी स्पर्धा जिंकून दाखवली. या दैदिप्यमान कामगिरीनंतर बीसीसीआयनं युवा रणरागिनींच्या वर्ल्ड चॅम्पियन संघासाठी ५ कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.
एकही सामना न गमावता जिंकली वर्ल्ड कपची ट्रॉफी
क्रिकेट जगतात भारतीयांचा दबदबा दाखवून देणाऱ्या लेकी मायदेशी परतल्या आहेत. भारतीय संघातील सदस्यांचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय संघानं दिमाखदार विजयाची नोंद केली होती. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ९ विकेट्स राखून पराभूत करत भारतीय अंडर १९ महिला संघानं दुसऱ्यांदा टी-२० कप स्पर्धा जिंकली.
विराटकडून मिळाली प्रेरणा, आई वडिलांना दिलं यशाचं श्रेय
भारतीय संघातील ड्रिथी केसरी आणि विक्रमी शतकवीर गोंगडी त्रिशा यांनी एएनआयशी संवादही साधला. यावेळी द्रिथी केसरी म्हणाली की, क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून विराट कोहलीकडून प्रेरणा घेते. माझ्या यशात कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे. या यशाचं श्रेय मी माझ्या आई-वडिलांना देईन, असे ती म्हणाली.
स्पर्धा गाजवणारी त्रिशा म्हणाली, मिताली राजला मानते आदर्श
भारतीय संघाच्या विजयात सर्वात आघाडीवर असलेला चेहरा म्हणजे गोंगडी त्रिशा. ती म्हणाली की, हा क्षण माझ्यासाठी खूपच खास आहे. वर्ल्ड कप जिंकणे आणि दोन वेळा प्लेयर ऑफ टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणं हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. वडिलांमुळे मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आई-वडिलांशिवाय हा प्रवास शक्यच झाला नसता. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजला आदर्श मानते, असेही ती यावेळी म्हणाली. गोंगडी त्रिशानं अंतिम सामन्यात ३३ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी केली होती. गोलंदाजीतही धमक दाखवत तिने प्लेयर ऑफ दम मॅचचा पुरस्कारही पटकवला होता. अंडर १९ टी वर्ल्ड कप स्पर्धेत त्रिशानं विक्रमी शतकी खेळीसह ३०९ धावांची खेळी केली.