Join us  

साहेबांच्या मायभूमीत भारताची 'दादा'गिरी, आठवतोय का 'हा' सामना ?

टीम इंडियाचा दादा आज 47 वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या उत्कष्ट खेळीच्या जोरावर आणि संयमी कर्णधारपदामुळे सौरवने जगभरातील क्रिकेटविश्वात आपले नाव केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 2:40 PM

Open in App

मुंबई - टीम इंडियाचा दादा आज 47 वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या उत्कष्ट खेळीच्या जोरावर आणि संयमी कर्णधारपदामुळे सौरवने जगभरातील क्रिकेटविश्वात आपले नाव केले. मात्र, इंग्रजांच्या घरात घुसून सौरवने केलेली 'दादा'गिरी जगाने पाहिली अन् आजही लक्षात ठेवली आहे. सन 2002 च्या नेटवेस्ट सिरीजमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात गांगुलीने फ्लिंटॉपच्या कृतीस जशास तसे उत्तर दिले. लॉर्ड मैदानावर अंगातील टी-शर्ट काढून गरागरा फिरवत सौरवने टीम इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन केले होते. गांगुलीचे नाव निघताच भारताच्या विजयाचा तो क्षण आजही चाहत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. 

सौरव गांगुलीच्या नेतृत्वात 2002 साली इंग्लंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर भारताचा अंतिम सामना सुरू होता. या सामन्यात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. तर केवळ दोनच गडी शिल्लक होते. आता, चेंडू इंग्लंडचा ऑलराऊंडर अँड्रीव्ह फ्लींटॉफच्या हातात होता. स्ट्राईकवर अनिल कुंबळे होता. पहिल्या 3 चेंडूत 5 धावा घेतल्यामुळे सामना भारताच्या बाजुने फिरला होता. मात्र, मैदानात बसलेला कर्णधार गांगुली चिंताग्रस्त होता. तेवढ्यात चौथ्या चेंडूवर अनिल कुंबळे धावबाद झाला. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांची धकधक सुरु झाली होती. तर फलंदाजीचा फ माहित नसलेला जवागलं श्रीनाथ स्ट्राईकवर आला होता. आता, भारतीय संघाला विजयासाठी 2 चेंडूत 6 धावा काढायचा होत्या आणि केवळ एकच गडी शिल्लक होता. त्यावेळी फ्लिंटॉप मध्यमगती चेंडू घेवून धावला. श्रीनाथच्या हालचालींचा वेध घेत त्यानं पाचवा चेंडू थेट यॉर्कर टाकला आणि श्रीनाथसह भारतही क्लीन बोल्ड झाला. वानखेडेवरील कलकलाट क्षणात बंद झाला आणि इंग्रजांच्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. रोमांचक सामन्यातील या विजयामुळे इंग्लंडचा संघ हर्षून गेला. त्याच आनंदाच्या भरात फ्लिंटॉपने आपला टी-शर्ट काढून मैदानावर चक्कर मारली. भारतभर नैराश्य पसरलं होतं आणि कर्णधार गांगुली आतून रडला होता. फ्लिंटॉपने उतरवलेली भारताची इज्जत गांगुलीला सळत होती. इंग्रजांची ती दादागिरी गांगुलीला पटत नव्हती. पण, राग व्यक्त करुन नाही, तर संयमानं या अपमानाचा बदला सौरव घेणार होता.

सन 2002 साली पुन्हा संधी आली. आता मुंबईऐवजी इंग्लंड होते. विरोधक तोच होता, ज्यानं मुंबईत भारताची इज्जत काढली होती. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 325 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 326 धावांचे लक्ष्य होते. नेटवेस्ट सिरीजमधील लॉर्ड मैदानात भारतीयांचा गोंधळ सुरूच होता. युवराज आणि कैफच्या दमदार फटकेबाजीनं भारतानं 300 चा टप्पा पार केला होता. आता जिंकण्यासाठी भारताला 7 बॉल 6 रन्स करायचे होते. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कैफने बॅट घुमवली आणि बॉल टप्पे खात मैदानाबाहेर गेला. मैदानावर पुन्हा गोंधळ सुरू झाला. भारतीय प्रेक्षक ऐमकेकांना टाळ्या देऊ लागले. मात्र, गांगुली चिंताग्रस्त होता, अंगावर निळा टी शर्ट चढवून नेहमीच्या स्टाईलने दातानं आपली नखं कुरतडं होतां. आता भारताला 6 चेंडूत 2 धावांची गरज होती. मैदानावर झहीर आणि कैफ ही जोडी होती. स्ट्राईकवर असलेल्या झहीरने ऑफ साईडला डिफेन्स शॉट खेळला अन् 1 धाव घेण्यासाठी धावला. इंग्लंडच्या फिल्डरने किपरकडे चुकीचा थ्रो केल्यामुळे चेंडू पुढे निघून गेला. धाव घेऊन स्ट्राईकवर आलेल्या कैफने झहीरला दुसरी धाव घेण्यासाठी कॉल दिला आणि इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेन जागेवरच मान खाली घालून कोसळला. भारतात एकच जल्लोष अन् लॉर्ड स्डेडियमवर भारतीयांचा गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी विजयाचा शिल्पकार असलेल्या मोहम्मद कैफवरुन कॅमेरा थेट बाल्कनीतील गांगुलीवर खिळला

लॉर्ड मैदानावर आपल्या अंगातील टी शर्ट काढून इंग्लंडची इज्जत जगभरात गरागरा भिरवणाऱ्या गांगुलीवर आता जगाच्या नजरा खिळल्या होत्या. घराघरात गांगुलीचे सिक्स पॅक टाळ्या वाजवून सहकुटुंब-सहपरिवार पाहिले जात होते. फ्लिंटॉपने केलेल्या अपमानाचा चक्रीवाढ व्याजासहित पुरेपूर बदला गांगुलीने आपली ‘दादा’गिरी दाखवून घेतला होता. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रानेही गांगुलीच्या सिक्स पॅक फोटोलाच मोठी पसंती दिली. ज्या इंग्रजांनी 150 वर्षे भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांच्या घरात घुसून त्यांना मारल्याचा आनंद भारतीयांना झाला होतां. एकवेळ सलमान खानने चित्रपटात काढलेला शर्ट लक्षात राहत नाही, पण गांगुलीने काढलेला तो टी-शर्ट आणि इंग्लंडची उतरवेली ती इज्जत भारतीय क्रिकट विश्वातील ‘अनफरगेटेबल मेमरी’ बनली आहे. तर इंग्लंडच्या धर्तीवरही गांगुलीच्या रुपाने भारताचाच ‘प्रिन्स’ दिसला.

टॅग्स :सौरभ गांगुलीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड