- सुनील गावसकर
तिस-या आणि अखेरच्या कसोटीत मिळविलेला रोमहर्षक विजय भारतीय संघाला आजपासून सुरू होत असलेल्या वन डे मालिकेत उतरण्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी यजमान संघात एबी डिव्हिलियर्स खेळणार नाही, हे ऐकून आणखी बळ मिळताच भारताच्या मालिका विजयाची शक्यता बळावली आहे.
अतिशय कठीण आणि बेभरवशाच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची कसोटी असेल शिवाय भारत वेगवान मारा खेळू शकत नाही, हा डाग पुसण्याचे आव्हान आहे. सत्य असे की येथे वेगवान माºयाला कुणीही फलंदाज तोंड देऊ शकला नाही. बॉडी माईन मालिकेदरम्यान डॉन ब्रॅडमन यांना देखील अपयश आले होते. त्यामुळे स्वत:च्या हृदयावर हात ठेवून कुणी फलंदाज मला वेगवान मारा खेळताना आनंद होतो, असे कुणी सांगू शकणार नाही. वाँडररर्सवर मात्र भारतीय खेळाडूंनी हिंमत दाखविली. निर्धार आणि जिद्दीने भारतीय फलंदाज खेळले.
आता वन डे मालिकेत उसळी घेणारे चेंडू खेळणारे फलंदाज निवडण्याची वेळ आली आहे. खेळपट्टीचे स्वरूप पाहून कोण फलंदाजी आणि गोलंदाजीत यशस्वी ठरेल, याचा वेध घेत संघ निवडावा लागणार आहे. एक जुनी म्हण अशी की‘ फॉर्म तात्पुरता तर क्लास हा कायमचा असतो.’ अजिंक्य रहाणेची दुसºया डावातील फलंदाजी ही म्हण सिद्ध करणारी ठरली. तो सलामीवीर म्हणून संघात निवडला गेला असला तरी वन डे संघात स्थान मिळेलच याची खात्री नाही. कसोटीत सलामीला येणारा लोकेश राहुल टी-२० त मधल्या फळीत खेळतो. कसोटीत मधल्या फळीत खेळणारा रहाणे वन डेत खरेतर सलामीलाच यायला हवा. दोघेही संधी मिळताच कुठल्याही स्थानावर फलंदाजी करण्यास सज्ज आहेत, ही संघाच्या जमेची बाब ठरावी.
दरबनची खेळपट्टी सामान्यपणे फलंदाजीपूरक मानली जाते. चेंडू येथे अलगद बॅटवर येतो. सीमारेषा लहान असल्याने गोलंदाजांना चेंडू टाकतेवेळी नेहमी सावध रहावे लागते. या सर्व घडामोडीत भारताला द. आफ्रिका दौºयात वन डे मालिका जिंकण्याची पहिल्यांदा सुवर्ण संधी असेल. भारतीय संघ येथे येऊन महिना झाला. त्यामुळे आव्हानाला तोंड देण्याचे संघात निश्चित बळ आले असावे. (पीएमजी)