बेंगळुरू : अंधांसाठीच्या त्रिकोणीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील बेंगळुरू येथे खेळविल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय अंध क्रिकेट संघाने इंग्लंडवर १९८ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाची गुणसंख्या ६ झाली आहे.
सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यावर
इंग्लंडचा कर्णधार एड हॉस्सेल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या संपूर्ण फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. पंकज भुये याने शानदार शतक केले तर अनिल घारगिया याने ९२ धावा करून त्याला साथ दिली. भारतीय संघाने २० षटकांमध्ये फक्त ३ गडी गमावून २४० धावा केल्या.
या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या खेळाडूंना काही सूर गवसला नाही आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांना फक्त ४२ धावांवरच रोखले. क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया आणि समर्थनम यांनी आयोजित केलेल्या या भारत, इंग्लंड आणि श्रीलंकेमधील ही द्विपक्षीय आणि त्रिकोणीय सामान्यांची मालिका २ ऑक्टोबर पासून भारतामध्ये सुरु झाली आहे. त्रिकोणीय सामन्यांच्या मालिकेतील यापुढचे सामने आता ८ ऑक्टोबर २०१८ पासून गोवा येथे खेळविले जातील.