Join us

भारताच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही!

ज्यो रुट (पहिली कसोटी), बेन स्टोक्स (क्वचित प्रसंगी) व डॅन लॉरेन्स (चौथा कसोटी सामना ) यांचा अपवाद वगळता फलंदाजीतील अपयश संघासाठी मोठी समस्या ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 05:55 IST

Open in App

अयाज मेमन

भारताचा ३-१ ने  मालिका विजय म्हणजे सांघिक कामगिरी व विश्वासाचे द्योतक आहे. पहिला सामना गमावल्यानंतर यजमान संघ दडपणाखाली होता. मालिकेसोबत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याच्या आशेला धक्का बसण्याची शक्यता होती. भारताने मात्र शानदार कामगिरी करीत तिसरी कसोटी दोन दिवसांपेक्षा कमी वेळेत आणि चौथी कसोटी डावाने जिंकली. पहिली कसोटी जिंकणारा इंग्लंड संघही यजमान संघाच्या कामगिरीमुळे चकित झाला.  

यापूर्वी २०१२-१३ मध्ये इंग्लंड संघाने येथे मालिका जिंकली होती. त्यावेळी कूक व पीटरसन यांनी मोलाची भूमिका बजावली होती. यावेळी मात्र तसे काही घडले नाही. स्टोक्सला अश्विनने निष्प्रभ केले. त्यामुळे सर्व भार रुटवर आला. इंग्लंड संघाची भिस्त भारतीय वातावरणाचा अनुभव असलेल्या खेळाडूंवर होती. त्यात रोटेशन पॉलिसीमुळे महत्त्वाच्या खेळाडूंना (जोस बटलर) पूर्ण मालिकेत खेळता आले नाही. त्याचप्रमाणे संघ निवडीबाबतही त्यांनी चुका केल्या. दिवस-रात्र कसोटीत फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली. 

ज्यो रुट (पहिली कसोटी), बेन स्टोक्स (क्वचित प्रसंगी) व डॅन लॉरेन्स (चौथा कसोटी सामना ) यांचा अपवाद वगळता फलंदाजीतील अपयश संघासाठी मोठी समस्या ठरले. त्यांनी खेळपट्टीबाबत शंका उपस्थित करीत आत्मसमर्पण केले. काही अंशी मोटेरामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानच्या खेळपट्टीवरील टीका उचित होती. उभय संघांना पहिल्या डावात दीडशेचा पल्ला गाठता न येणे खेळपट्टीला दोष देण्यास पुरेसे आहे. चौथ्या कसोटीत दोन्ही डावात घसरगुंडी उडण्यासाठी खेळपट्टीला दोष देता येणार नाही. याच खेळपट्टीवर भारताने पहिल्या डावात अखेरच्या चार फलंदाजांनी २१९ धावांची भर घातली. इंग्लंडचा खेळ कमकुवत होता, हे मानले तरी भारताच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांकडे डोळेझाक करता येणार नाही. पहिली कसोटी गमावल्यानंतरही क्षमता आणि प्रयत्नांच्या सामूहिक जोरावर हा मालिका विजय साकारला आहे.

वैयक्तिक कामगिरीत अश्विन आणि अक्षर यांनी इंग्लंडच्या फलंदाजांंना स्वत:भोवती गरगर फिरवले. काही दिवस दोघे इंग्लिश फलंदाजांच्या स्वप्नातही येतील. रोहित शर्मा यानेही स्वत:चा फॉर्म सिद्ध केला. चेंडू लाल असो की पांढरा, जगातील एक भक्कम फलंदाज म्हणून रोहितचे नाव शिखरावर पोहोचले आहे. वॉशिंग्टन सुंदरने देखील स्वत:ची परिपक्वता सिद्ध केल्यामुळे जडेजा परत येईल, तेव्हा सुंदरला कसे बाहेर ठेवायचे याबाबत व्यवस्थापनाला दोनदा विचार करावा लागेल.

(लेखक लोकमत वृत्तसमूहात कन्सल्टींग एडिटर आहेत)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड