Join us  

भारतीय महिला संघाकडून देशवासीयांना भाऊबीजेची विजयी भेट, सलामीच्या लढतीत न्यूझीलंडला नमवले

आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत भारतीय महिला संघाने देशवासियांना भाऊबीजेची विजयी भेट दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 11:44 PM

Open in App

प्रोव्हिडन्स : आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत भारतीय महिला संघाने देशवासियांना भाऊबीजेची विजयी भेट दिली आहे. भारतीय संघाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 20 षटकांमध्ये 9 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. फलंदाजीमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरचे शतक, मुंबईकर जेमिमा रॉड्रिक्सचे संयमी अर्धशतक आणि पूनम यादव आणि हेमलता दयालन यांची भेदक गोलंदाजी हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. भारताने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दमदार सुरुवात केली. सुझी बेट्स आणि एएम पीटरसन यांनी 6.2 षटकांतच संघाला पन्नाशीपार पोहोचवले. दरम्यान, हेमलताने पीटरसनची (14) विकेट काढली. त्यानंतर पूनम यादवने सोफी डिव्हाइन (9) आणि जेएम वॉटकीन (0) यांना पाठोपाठ माघारी धाडत न्यूझीलंडला अडचणीत आणले. दुसरीकडे सुझी बेट्स हिने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले. मात्र अरुंधती रेड्डी हिने तिला 67 धावांवर बाद करून न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्यानंतर केथ मार्टिन हिने झुंज देत न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण तिचे प्रयत्नही अपुरे पडले. अखेरीस न्यूझीलंडला  20 षटकांमध्ये 9 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हेमलता दयालन आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 3, राधा यादव हिने दोन आणि अरुंधती रेड्डीने एक विकेट्स घेतली.  तत्पूर्वी जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी न्यूझीलंडसमोर 195 धावांचे आव्हान ठेवले. हरमनप्रीतने 51 चेंडूत 103 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली.  नाणेफेक जिंकून कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. अवघ्या 40 धावांत तीन विकेट माघारी परतल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडेल असे वाटले होते. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या हेमलता दयालनला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने सुरुवातीला संयमी खेळ करून खेळपट्टीवर जम बसवला. हरमनप्रीतने फटकेबाजी करत संघाच्या धावांचा वेग वाढवला. भारताने पहिल्या 10 षटकांत 76 धावा केल्या होत्या. जेमिमा व हरमनप्रीत यांनी जम बसवत न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर प्रहार केला. हरमनप्रीतने मागून येऊन वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. तिने 33 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत अर्धशतक झळकावले. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. जेमिमानेही 39 चेंडूत अर्धशतक (6 चौकार) पूर्ण केले. दरम्यान, हरमनप्रीतचे टी-20 सामन्यातील हे पहिलेच शतक आहे.या दोघींनी भारतीय संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. भारतीय महिलांनी सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २० षटकांत 5 बाद 194 धावा चोपल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटआयसीसीभारतीय क्रिकेट संघ