आॅकलंड : मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा नांगी टाकल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसºया टी२० सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध चार गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी कूच केली. वेलिंग्टनच्या पहिल्या सामन्यात भारत २३ धावांनी पराभूत झाला होता. मधली फळी अपयशी ठरल्याने युवा जेमिमा रॉड्रिग्जने केलेली ७२ धावांची तडाखेबंद खेळी व्यर्थ ठरली.
मालिका बरोबरीत करण्यासाठी भारताला हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकायचा होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या दहा षटकात २ बाद ७२ धावा करीत चांगली सुरुवात केली, पण अखेरच्या दहा षटकात फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीमुळे भारताला अखेर ६ बाद १३५ पर्यंतच वाटचाल करता आली. न्यूझीलंडने हा सामना अखेरच्या चेंडूवर जिंकला. त्यासाठी त्यांनी सहा फलंदाज गमावले.
कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक ठोकणाºया जेमिमा रॉड्रिग्जने ५३ चेंडूत ७२ धावा आणि स्मृती मानधनाने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. दोघींनी दुसºया गड्यासाठी ६३ धावांची शानदार भागीदारी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर केवळ ५ धावा काढून परतली. यानंतर न्यूझीलंडची सुरुवातही खराब झाली. मात्र, तरीही भारताला त्याचा फायदा घेता आला नाही. सोफी डिव्हाईन (१९) आणि कॅटलिन (४) या लवकर बाद झाल्या. सूजी बेट्सने ६२ आणि एमी सेटर्थवटने २३ धावा करीत ६१ धावांची भागीदारी केली. यजमान फलंदाजांनी यावेळी भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भरपूर लाभ घेतला. राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी भारतासाठी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
भारत (महिला) : २० षटकात ६ बाद १३५ धावा (जेमिमा रॉड्रिग्ज ७२, स्मृती मानधना ३६; रोसमेरी मेर २/१७, एस. डिवाइन १/१६, कास्पेरेक १/२०.) पराभूत वि. न्यूझीलंड (महिला) : २० षटकात ६ बाद १३६ धावा. (सूजी बेट्स ६२, एमी सेटर्थवट २३; अरुंधती रेड्डी २/२२, राधा यादव २/२३.)