नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाचे (T20 World Cup 2022) बिगुल वाजण्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत. या बहुचर्चित स्पर्धेसाठी सर्व संघाची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यामधील ८ संघांनी अगोदरच सुपर-१२ मध्ये प्रवेश केला आहे, तर उरलेल्या ८ संघांमध्ये पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. उरलेल्या ८ संघांमधील ४ संघांना सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरूद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. विशेष बाब म्हणजे रोहित सेना आगामी विश्वचषकासाठी ६ ऑक्टोंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील मालिका ४ ऑक्टोंबरला संपणार आहे. यानंतर टी-२० विश्वचषकासाठी सर्वच संघ ऑस्ट्रेलियाच्या दिशेने कूच करतील. लक्षणीय बाब म्हणजे विश्वचषकासाठी निवडलेले खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग नसतील, त्यामुळे त्यांना लवकर ऑस्ट्रेलियाला पोहचण्याची संधी मिळेल. माहितीनुसार, भारतीय संघातील राखीव खेळाडू देखील ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. ज्यामध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे.
फक्त स्क्वॉडचा खर्च उचलते ICC
आयसीसी स्पर्धांमध्ये आयसीसीकडूनच संघांना प्रवासात मिळणाऱ्या सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे भारताचा १५ सदस्यीय संघ या सोयींसाठी पात्र असेल. मात्र राखीव ४ खेळाडूंना स्वखर्चाने बीसीसीआयला ऑस्ट्रेलियाला न्यावे लागेल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही स्वत:च करावी लागेल.
संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला उर्वरित संघासह राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवण्यास सांगितले आहे. जेणेकरून सरावादरम्यान कोणत्याही खेळाडूला काही समस्या आल्यास राखीव खेळाडू तात्काळ संघाशी जोडला जाईल. जेव्हा शेवटच्या वेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी जवळपास निम्मा संघ दुखापतग्रस्त झाला होता. ब्रिस्बेन कसोटीदरम्यान त्या सर्व खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामाविष्ट करण्यात आला होता, जे केवळ सपोर्ट स्टाफ म्हणून संघासोबत गेले होते.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना