नवी दिल्ली ।
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे तर रविंद्र जडेजाची उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने बुधवारी वेस्टइंडिजविरूद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. विशेष म्हणजे क्रिकेट वर्तुळात ज्या चर्चा रंगल्या होत्या अगदी तसच झाल्याचं पाहायला मिळालं, कारण या दौऱ्यासाठी संघातील काही प्रमुख खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर शुभमन गिलचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे.
धवनची दुसऱ्यांदा कर्णधारपदी वर्णी
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनकडे दुसऱ्यांदा कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यापूर्वी त्याने श्रीलंका दौऱ्यावर असताना दुसऱ्या दर्जातील भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्याने टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद सांभाळले होते. तर ऑलराउंडर रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे, जो प्रथमच ही जबाबदारी सांभाळणार आहे.
वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
असा असेल भारताचा वेस्टइंडिज दौरा
२२ जुलै - पहिला एकदिवसीय सामना - पोर्ट ऑफ स्पेन
२४ जुलै - दुसरा एकदिवसीय सामना - पोर्ट ऑफ स्पेन
२७ जुलै - तिसरा एकदिवसीय सामना - पोर्ट ऑफ स्पेन
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
२९ जुलै - पहिला टी-२० सामना - पोर्ट ऑफ स्पेन
१ ऑगस्ट - दुसरा टी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
२ ऑगस्ट - तिसरा टी-२० सामना - सेंट किट्स आणि नेव्हिस
६ ऑगस्ट - चौथा टी-२० सामना - फ्लोरिडा
७ ऑगस्ट - पाचवा टी-२० सामना - फ्लोरिडा
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)