Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shaheen Afridi: शाहिन आफ्रिदीने मागील विश्वचषकात केली होती भारतीय खेळाडूंची नक्कल, चाहत्यांनी साधला निशाणा

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:22 IST

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी ग्रुप बी मध्ये आहेत. भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून विजयी सलामी दिली होती. भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तानने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला तर दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला. पाकिस्तानला भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मागील अर्थात २०२१ च्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने भारतीय खेळाडूंची नक्कल केली होती. 

दरम्यान, आफ्रिदीचा जुना व्हिडीओ व्हायरल करून भारतीय चाहते पाकिस्तानी संघाल प्रत्युत्तर देत आहेत. खरं तर मागील विश्वचषकात पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. एकट्या विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून डाव सावरला होता. याचाच दाखल देत आफ्रिदीने लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीची चाहत्यांसमोर नक्कल केली होती. मात्र आता सगळे काही बदलले असल्याचे म्हणत भारतीय चाहते निशाणा साधत आहे. 

शाहिन आफ्रिदीचा जुना व्हिडीओ व्हायरलखरं तर विश्वचषकात गुरूवारी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना पार पडला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला १३१ धावांचे आव्हानात्मक आव्हान दिले होते. झिम्बाब्वेच्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने घेतलेल्या ४ विकेटमुळे झिम्बाब्बेच्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. मात्र १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला. अखेर झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवून इतिहास रचला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक 44 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला देखील सुरूवातीपासून मोठे झटके बसले. मोहम्मद रिझवान (१४), कर्णधार बाबर आझम (४), शान मसूद (४४), इफ्तिखार अहमद (५), शादाब खान (१७) आणि हैदर अली (०) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ल्यूक जोंगवे यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभवपाकिस्तानला अखेरच्या ९ चेंडूमध्ये १८ धावांची गरज होती. अशातच मोहम्मद नवाजने एक शानदार षटकार ठोकला. ८ चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना नवाजने एक धाव काढून मोहम्मद वसीमला स्ट्राईक दिले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. झिम्बाब्वेकडून शेवटचे षटक ब्रॅड इव्हान्स घेऊन आला. पहिलाच चेंडू मोहम्मद नवाजने बाउंड्रीच्या दिशेने मारला मात्र झिम्बाब्वेच्या फिल्डरने केलेल्या शानदार फिल्डिंगमुळे चौकार वाचला या चेंडूवर पाकिस्तानने ३ धावा खेचल्या. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद वसीमने चौकार ठोकून विजयाकडे कूच केली. तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक धाव काढून मोहम्मद नवाजला स्टाईक दिले. आता ३ चेंडूत ३ धावांची गरज असताना तिसरा चेंडू डॉट गेला. २ चेंडूत ३ धावांची गरज होती, दुसऱ्या चेंडूवर नवाज बाद झाला आणि झिम्बाब्वेने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती, शाहिन आफ्रिदीने अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने एक धाव काढली आणि दुसरी धाव काढताना शाहिन आफ्रिदी धावबाद झाला. अखेर झिम्बाब्वेने विजयावर शिक्कामोर्तब केला आणि ऐतिहासिक कामगिरी केली. आक्रमक वाटणारा मोहम्मद नवाज अखेरच्या षटकात झेलबाद झाला. 

पाकिस्तानला कोहलीने दिले प्रत्युत्तर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहली
Open in App