लंडन- इग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या A क्रिकेट संघातील खेळाडूंना ' धडक' चित्रपटाच्या गाण्याने याड लावलय. मराठीतील सुपरहिट चित्रपट सैराटचा रिमेक असलेला धडक हा बॉलिवूड चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या झिंगाट गाण्यावर भारतीय संघातील खेळाडूंनी ठेका धरला. मोहम्मद सिराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खेळाडू नाचत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे.
इशान खट्टर आणि जान्हवी कपुर यांची प्रमुख भूमिका धडक चित्रपटात आहे. मराठीतील झिंगाटच्या हिंदी गाण्यावर मोहम्मद सिराजसह अंकित बावणे आणि संघातील अन्य सदस्य नाचले. सिराजने पोस्ट केलेल्या व्हिडीओखाली "having g fun on#zingaat song last day in London. see you soon." अशी कॅप्शन दिली आहे.
भारताचा महान खेळाडू राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली भारत A संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. तेथे त्यांनी इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडीज A संघाविरुद्ध ५० षटकांची मालिका खेळली आणि अंतिम लढतीत इंग्लंड लायन्सला ५ विकेट राखून नमवत भारताने मालिका जिंकली. त्यानंतर वेस्ट इंडीज A संघाविरुद्ध तीन चार दिवसीय सामने आणि लायन्सविरूध्द दोन चारदिवसीय सामने खेळले. या दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात भारताला लायन्सने २५३ धावांनी पराभूत केले.