बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलंन्सीमध्ये भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची यो-यो टेस्ट झाली. ही फिटनेस टेस्ट पास करून रोहित मुंबईत परतला आहे. आता त्याचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हयरल होत आहे. यात तो बोलत आहे, "तुम्ही मोठे लोक आहात भाऊ. तुम्हाला कुणीही हात लावू शकत नाही."
रोहित शर्माने याच वर्षात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, गेल्या वर्षी त्याने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो केवळ एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळतो. भारताची पुढची एकदिवसीय मालिका ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियासोबत होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो ऑस्ट्रेलिया 'A' विरुद्ध, भारत 'A' संघाकडूनही खेळू शकतो.
काय आहे व्हिडिओमध्ये? -व्हायरल व्हिडिओमध्ये, रोहित शर्मा विमानतळावर आहे. यावेळी बरेच लोक त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेताना दिसत आहेत. दरम्यान, रोहित त्यांना विचारतो की, तुम्ही भाऊ लोक? यावर ते उत्तर देतात, आम्ही पापाराझी आहोत. यावर रोहित म्हणतो, "हो पापाराझी, तुम्ही फार मोठे लोक आहात भाऊ, तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही."
ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, रोहित शर्मासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे, अंतिम सामन्यात ७६ धावांची खेळी करणाऱ्या रोहितला सामनावीराचा किताबही मिळाला होता.