भारताचा अनुभवी क्रिकेटपटू लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी आपल्या चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. लोकप्रिय जोडीनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर करत आपल्या घरी 'नन्ही परी'चं स्वागत करत आहोत, अशी माहिती शेअर केली आहे. आई-बाबा झाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सची अक्षरश: बरसात होताना दिसत आहे. केएल राहुल हा यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. तो पहिली मॅच सोडून या खास क्षणी घरी परतला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केएल राहुल-अथिया जो़डीनं सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी
केएल राहुल आणि अथिया शेट्टी या जोडीनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले होते. ज्यात अथिया शेट्टी बेबी बंप फ्लाँट करताना दिसली होती. आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून बाहेर पडत पहिली मॅच खेळण्याऐवजी केएल राहुलनं घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. लोकेश राहुलनं सोमवारी पत्नी आथियासह इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्टही शेअर करत कुटुंबियात नव्या सदस्याचे आगमन झाल्याची माहिती दिली आहे. या जोडप्याने दोन हंसांचे एक खास पोस्टर शेअर करत मुलगी झाली हो... अशी माहिती चाहत्यांना दिली आहे. मुलीचा जन्म हा “२४-०३-२०२५” या तारखेला झाल्याचा उल्लेखही या पोस्टमध्ये दिसून येतो.
नोव्हेंबरमध्ये दिली होती प्रेग्नंसीसंदर्भातील माहिती
अथिया शेट्टी आणि केएल राहुल या जोडीनं नोव्हेंबर २०२४ मध्ये दोघांच्या आयुष्यात सुंदर क्षण येणार असल्याचे सांगत प्रेग्नंसीची घोषणा केली होती. २०२५ मध्ये बाळाचे स्वागत करण्यासाठी आतूर आहोत, असा उल्लेखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला होता. लोकेश राहुल हा क्रिकेट जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. दुसरीकडे अथिया शेट्टी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. अनेक वर्षे एकमेकांसोबत डेटिंग केल्यावर २०२३ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. आता २०२५ मध्ये अथिया आणि लोकेश राहुल आई बाबा झाले आहेत.