- अमोल मचाले पुणे : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान विविध गोष्टींमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात येत्या शुक्रवारी आणखी एक मोलाची भर पडणार आहे. टीम इंडिया आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना बांगलादेशाविरुद्ध खेळणार असून गुलाबी चेंडूने होणाऱ्या या दिवस-रात्र कसोटीबाबत भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कोलकता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमच्या साक्षीने हा गुलाबी क्षण भारतीय क्रिकेटविश्व प्रथमच अनुभवणार आहे.दिवस-रात्र कसोटी क्रिकेटचे वय तसे काही फार जास्त नाही. साधारणत: ४ वर्षांपूर्वी, नोव्हेंबर २०१५ पासून हा सिलसिला सुरू झाला. अॅडलेड येथे यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे शेजारी जागतिक क्रिकेटमधील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळले. अवघ्या तीन दिवसांत निकाल लागलेली ही लढत कांगारूंनी ३ गडी राखून जिंकली. सुमारे सव्वा लाख प्रेक्षक अॅडलेड ओव्हलच्या म़ैदानावर रंगलेल्या या ऐतिहासिक कसोटीचे साक्षीदार झाले होते. टीम इंडिया खेळत असलेली ही दिवस कसोटी लढत आंतरराष्ट्रीय स्तरावरील १२वा सामना असेल.कांगारूंची दादागिरीदिवस-रात्र कसोटी लढतींमध्ये आतापर्यंत ११ लढती झाल्या आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक ५ सामने खेळला. मायदेशात झालेल्या या सर्व लढती जिंकून कांगारुंनी दिवस-रात्र कसोटी प्रकारात दादागिरी राखली आहे. उर्वरित ६ कसोटींपैकी श्रीलंकेने २, तर पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. सर्वाधिक दिवस-रात्र कसोटींचे यजमानपद भूषविण्याचा मान ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल स्टेडियमकडे जातो. येथे आतापर्यंत तीन लढती झाल्या. त्यानंतर दुबई आणि ब्रिस्बेनमध्ये प्रत्येकी २ सामने झाले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय क्रिकेटविश्व प्रथमच अनुभवणार ‘गुलाबी’ क्षण!
भारतीय क्रिकेटविश्व प्रथमच अनुभवणार ‘गुलाबी’ क्षण!
टीम इंडियाच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:27 IST