मुंबई : भारतीय क्रिकेटसाठी चांगले कार्य करण्याची मोठी संधी मला मिळाली आहे. कारण बीसीसीआयची प्रतिमा खराब झालेली असताना मला या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केली.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी गांगुली यांनी अर्ज भरला. या वेळी एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला व निरंजन शहा हे दिग्गज क्रिकेट प्रशासकही उपस्थित होते. गांगुलीशिवाय इतर कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने गांगुली यांच्या अध्यक्षपदाच्या घोषणेची औपचारिकता उरली आहे.
अध्यक्षपद निश्चित झाल्यानंतर गांगुली यांनी सांगितले की, ‘देशासाठी मी खेळलो असून नेतृत्वही केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदी निवडून येणे खूप चांगला अनुभव आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीसीसीआयची स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. बोर्डाची प्रतिमा मलिन झाली असून मी अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षपद सांभाळण्यास सज्ज झालो आहे. त्यामुळे चांगले काम करण्यासाठी माझ्याकडे ही सुवर्णसंधी आहे.’
आपल्या योजनांविषयी सांगताना गांगुली म्हणाले की, ‘सर्वप्रथम मी बोर्डाशी संलग्न प्रत्येक पदाधिकारी, सदस्य यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल. तरी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या देखभालीवर माझे प्राधान्य असेल. गेल्या तीन वर्षांपासूनही मी सीओएला हे सांगत आलो आहे, पण त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळेच सर्वप्रथम मी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करेन.
दरम्यान, ‘कुलिंग आॅफ’ नियमामुळे गांगुली यांचे अध्यक्षपद केवळ नऊ महिन्यांचे असेल. यावर गांगुली यांनी म्हटले की, ‘होय, नियम हाच असून आम्हाला याचे पालन करावेच लागेल. जेव्हा मी येथे आलो होतो, तेव्हा अध्यक्षपद मला मिळेल याची कल्पनाही नव्हती. परिस्थिती बदलल्यानंतर मला चित्र स्पष्ट झाले. मी कधीही बीसीसीआय निवडणूक लढवलेली नसल्याने बोर्डरूम राजकारणाविषयी मला कोणतीही माहिती नव्हती.’
हितसंबंध सर्वात मोठी अडचण
गांगुली यांनी परस्पर हितसंबंधाचा मुद्दा क्रिकेट प्रशासनात सर्वात मोठी अडचण असल्याचे सांगितले. स्वत: गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) अध्यक्षपदी असून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मेंटॉरही आहेत. यामुळे त्यांनाही या अडचणीला सामोरे जावे लागले होते. गांगुली यांनी याआधीच दिल्लीचे पद सोडले असून २३ आॅक्टोबरला अधिकृतपणे बीसीसीआय अध्यक्षपद सांभाळल्यानंतर ते ‘कॅब’चे अध्यक्षपदही सोडतील. गांगुली म्हणाले की, ‘परस्पर हितसंबंध मुद्दा अडचणीचा प्रश्न ठरत आहे. या मुद्द्यामुळे सर्वोत्तम क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट प्रशासनामध्ये सेवा देऊ शकतील का यावर मला शंका आहे.’
जीसीएचीही दमदार ‘बॅटिंग’!
गांगुली यांना अध्यक्षपदावर आणण्यासाठी गोवा क्रिकेट संघटनेचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले. कोणत्याही स्थितीत एखाद्या खेळाडूलाच या मोठ्या पदावर संधी मिळावी, असा अट्टहास जीसीएचा होता. त्यामुळेच गेल्या तीन-चार दिवसांपासून जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर मुंबईत तळ ठोकून होते. जीसीएच्या योगदानाचे गांगुलीने स्वत: कौतुक केले आणि पदाधिकाऱ्यांचे आभारही मानले.
६५ वर्षांनंतरचा दुसरा कर्णधार
पूर्णवेळ बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविणारा गांगुली दुसरा कर्णधार ठरणार आहे. ६५ वर्षांपूर्वी हा मान भारताचे माजी कर्णधार महाराजकुमार आॅफ विजयानगरम यांनी मिळवला होता. महाराजकुमार यांनी १९३६ साली ३ कसोटींत नेतृत्व केले होते. त्यानंतर १९५४ ते १९५६ दरम्याने ते बीसीसीआय पूर्णवेळ अध्यक्ष होते. माजी कर्णधार सुनील गावसकर २०१४ मध्ये हंगामी अध्यक्षपदी होते.
जय शहा सचिवपदी; वर्मा उपाध्यक्षपदी
माजी कर्णधार सौरव गांगुली आणि जय शहा यांनी २३ आॅक्टोबरला होणाºया बीसीसीआय निवडणुकीमध्ये अनुक्रमे अध्यक्ष व सचिव पदासाठी अर्ज भरला. सर्व संदस्यांची बिनविरोध निवड होण्याचे निश्चित आहे. तसेच एम. वर्मा (उपाध्यक्ष), अरुणसिंग धुमाळ (खजिनदार), ब्रिजेश पटेल (आयपीएल परिषद), जयेश जॉर्ज (संयुक्त सचिव), खैरुल जमील मुझुमदार (संचालन परिषद) व प्रभज्योत सिंग भाटिया यांचीही बिनविरोध निवड निश्चित आहे.