INDWvsMALW Live : भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला. शफाली वर्माचे ( Shafali Verma) दमदार अर्धशतक अन् जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर भारताने १५ षटकांत मलेशियासमोर तगडे लक्ष्य ठेवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावणारी शफाली पहिली भारतीय ठरली.
स्मृती मानधना ( २७) आणि शफाली यांनी ५.२ षटकांत फलकावर ५७ धावा चढवल्या चौकार) झेलबाद झाली. पावसामुळे वेळ वाया गेल्याने १५-१५ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. शफाली आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांना जोरदार फटकेबाजी केली. शफालीने ३९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली आणि जेमिमासह दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ८६ धावा जोडल्या. जेमिमाने मोर्चा सांभाळला अन् संघाला १५ षटकांत २ बाद १७३ धावा उभारून दिल्या. जेमिमा २९ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४७ धावांवर नाबाद राहिली, तर रिचा घोषने ७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा केल्या.
पावसामुळे खेळ बाधित झाल्यामुळे मलेशियासमोर DLS नुसार विजयासाठी १५ षटकांत १७७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. पण, पावसाने पुन्हा खोडा घातला अन् भारताला विजयी घोषित करण्यात आले. मलेशियाने केवळ २ चेंडूंचा सामना केला अन् १ धावा केली होती. मलेशियापेक्षा टीम इंडियाचे मानांकन अव्वल असल्याने त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला. त्यांना बांगलादेशचा सामना करावा लागू शकतो.
