कॅनबरा : महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया तिरंगी मालिका खेळणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा बलाढ्य संघाचा समावेश असलेल्या या मालिकेत टीम इंडियानं विजयी सलामी दिली. भारतीय महिलांनी तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंड महिला संघावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. इंग्लंडचे 7 बाद 147 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 19.3 षटकांत 5 बाद 150 धावा करून पार केले. विजयासाठी चार धावांची गरज असताना कर्णधार हरमनप्रीतनं षटकार खेचला.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड महिला संघानं कर्णधार हिदर नाइटच्या अर्धशतकाच्या जोरावर समाधानकारक पल्ला गाठला. अॅमी जोन्स आणि डॅनिएल वॅट हे सलामीचे फलंदाज अवघ्या 9 धावांवर माघारी पाठवले. टीम इंडियाच्या राजेश्वरी गायकवाडनं या दोघींना बाद केले. त्यानंतर नॅटली स्कीव्हर आणि नाइट यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, 38 धावा असताना स्कीव्हर माघारी परतली. त्यापाठोपाठ फ्रॅन विल्सन ( 7) झटपट बाद झाली. पण, नाइटनं 44 चेंडूंत 8 चौकार व 2 षटकार खेचून 67 धावा केल्या. तिला टॅमी बीयूमोंटनं ( 37 ) दमदार साथ दिली. राजेश्वरी, शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
टीम इंडियालाही साजेशी सुरुवात करता आली नाही. स्मृती मानधना ( 15), जेमिमा रॉड्रीग्ज ( 26) लगेच माघारी परतल्या. शेफाली वर्मानं 30 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं 34 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 42 धावा करताना संघाचा विजय पक्का केला. वेदा कृष्णमुर्ती ( 7) आणि तानिया भाटीया ( 11) यांना अपयश आल्यानं सामना अखेरच्या षटकापर्यंत ताणला गेला.