बांगलादेशमधील अंतर्गत राजकीय परिस्थिती सध्या अस्थिर आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यावर वातावरण आणखी तणावपूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानात नियोजित असलेली द्विपक्षीय मालिका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशविरुद्धची मालिका स्थगित, कारण.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील विश्वविजेता भारतीय महिला संघ आणि बांगलादेश यांच्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची द्विपक्षीय मालिका नियोजित होती. या मालिकेतील सामने कोलकाता आणि कटकच्या मैदानात खेळवण्यात येणार होते. पण आता बीसीसीआयने ही मालिका स्थगित केल्याचे वृत्त समोर आले आहे. बांगलादेशमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बांगलादेशच्या जागी अन्य संघाला बोलवण्याचा विचार
BCCI च्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही डिसेंबरमध्ये आणखी एक दुसरी मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत." बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडूनही दौरा स्थगित करण्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. बीसीसीआयकडून नियोजित मालिका स्थगित करण्यात पत्र मिळाल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वर्ल्ड चॅम्पियन झाल्यामुळे भारतीय महिला संघा क्रेझ वाढली, आता...
भारतीय महिला क्रिकेट संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय महिला संघाची क्रेझ वाढली असून संघ पुन्हा मैदानात कधी उतरणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. बांगलादेश विरुद्धची मालिका स्थगित करण्यात आल्यावर त्याऐवजी कोणता संघ भारत दौऱ्यावर खेळणार ते पाहण्याजोगे असेल.