नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषकात (Asia Cup 2022) शानदार सुरूवात केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारून रोहित सेनेने विजयी सलामी दिली. पाकिस्तानला 5 बळी राखून पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात हॉंगकॉंगचा 40 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने या विजयासह सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप ए मधून भारताने तर ग्रुप बी मधून अफगाणिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू मोहम्मद हफिजने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भारतीय संघावर निशाणा साधला आहे. मोहम्मद हफिजने म्हटले, रोहित शर्मा नेहमी गोंधळलेल्या व्यक्तीसारखा दिसतो. तो जे बोलतो ते होताना दिसत नाही. हाँगकाँगविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर रोहित म्हणाला होता की खेळपट्टी चांगली दिसत आहे, पण त्याने जरी नाणेफेक जिंकली असती तर त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, अशा शब्दांत हफीजने रोहित शर्माची खिल्ली उडवली. या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ केवळ 152 धावा करू शकला.
पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा जावई शोध रोहित शर्मा ज्या पध्दतीने बोलत आहे की आम्ही संघासाठी हे करत आहोत ते करत आहोत. मात्र ते खरं तर तसे होत नाही आणि हे सर्वांना दिसत देखील नाही. एक प्रकारे तो म्हणत आहे की खेळपट्टी चांगली दिसत आहे. त्यामुळे आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. पण त्याला गोलंदाजी करायची होती असेही तो म्हणत आहे. म्हणजेच हाँगकाँगविरुद्धचा सामना हरण्याची भीती त्याला होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे मोहम्मद हफिजने अधिक म्हटले.
सुपर-4 मध्ये केला प्रवेश हॉंगकॉंगच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सुरूवातीला भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करून डाव पुढे नेला. हॉंगकॉंगच्या गोलंदाजांची गती अतिशय धीमी असल्यामुळे रोहित, विराटसह के.एल राहुल यांना मोठे फटकेबाजी करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करून हॉंगकॉंगसमोर तगडे आव्हान उभे केले. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूंत 68 धावांची ताबडतोब खेळी करून हॉंगकॉंगच्या गोलंदाजांना घाम फोडला. तर विराट 44 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 59 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 42 चेंडूंत 98 धावांची भागीदारी केली. अखेर भारताने 40 धावांनी सामना आपल्या नावावर केला. या विजयासह भारतीय संघाने अफगाणिस्तान पाठोपाठ सुपर-4 मध्ये प्रवेश केला.