ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात जवळपास 21 नो बॉल टाकण्यात आले. पण, पंचांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टाकलेले नो बॉल टिपता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळेच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि त्यानंतरच्या वन डे मालिकेसाठी पंचांच्या बाबतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मैदानावरील पंचांकडून एक जबाबदारी काढून घेतली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉलवर लक्ष ठेवण्याचं काम TV पंच करणार असल्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ठेवला होता. त्या प्रस्तावाची चाचपणी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत करण्यात येणार आहे. ''पुढील काही महिन्यांत काही स्पर्धांमध्ये नो बॉलवर तिसरा पंच लक्ष ठेवणार आहे. या प्रस्तावाची चाचपणी करण्यात येईल. त्याची सुरुवात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत करण्यात येईल,'' अशी माहिती आयसीसीच्या प्रवक्त्यांनी दिली.
इंडियन प्रीमिअर लीगमध्येही मागील मोसमात पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका रॉयल चॅलेंजर बंगळुरूला बसला होता आणि त्यावर विराट कोहलीनं तीव्र नाराजी प्रकट केली होती. त्याचा गांभीर्यानं विचार करत आयपीएलच्या गव्हर्निंग कौंसिलनं 2020च्या स्पर्धेत नो बॉल पाहण्याची जबाबदारी TV पंचांवर सोपवण्याचा निर्णय घेतला.
विंडीज मालिकेचे वेळापत्रक
ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - हैदराबाद
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - मुंबई
वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक