Join us

India vs West Indies Test: टीम इंडियाला नमवण्यासाठी दोन दिग्गज विंडीज संघाला करणार मार्गदर्शन

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत हार पत्करावा लागल्यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाला कसोटी मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 12:10 IST

Open in App

जमैका, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत हार पत्करावा लागल्यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाला कसोटी मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे आव्हान पेलवणे त्यांना सोपे नक्कीच नसेल. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाल्यामुळे या कसोटी मालिकेला एक वेगळीच उंची मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही संघ कोणतीच कसर बाकी ठेवणार नाही. पण, यजमानांची कामगिरी पाहता त्यांना कसोटी मालिकेतही डोळ्यासमोर पराभव दिसत असावा, म्हणूनच त्यांच्या मदतीला दोन दिग्गज फलंदाज धावले आहेत.महान फलंदाज ब्रायन लारा आणि रामनरेश सारवान कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची तयारी करून घेणार आहेत. घरच्या मैदानावर झालेल्या मागील कसोटी मालिकेत विंडीजनं इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारताविरुद्धही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, शिमरोन हेटमायर आणि शाय होप या फलंदाजांना पुन्हा फॉर्मात आणण्यासाठी विंडीज क्रिकेट बोर्डानं लारा आणि सारवान यांच्याकडून मदत मागितली आहे. या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 17795 धावा केल्या आहेत. हे दोघेही वेस्ट इंडिजच्या सराव सत्रात सहभागी होणार आहेत. 

''संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांच्याकडे भविष्याचे स्टार म्हणून पाहिले जात आहे,'' असे वेस्ट इंडिज क्रिकेटचे संचालक जिमी अॅडम यांनी सांगितले. ते म्हणाले,''कसोटी क्रिकेटमध्ये संघात सकारात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. आम्ही इंग्लंडला पराभूत करण्याचा पराक्रम केला आणि त्यामुळे खेळाडूंचाही आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही लारा आणि सारवान यांची मदत मागितली आहे.''  

कसोटी मालिका22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून

कसोटीसाठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहली