ठळक मुद्देभारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत घेतली 1-0ने आघाडीविराट कोहली अन् लोकेश राहुलची अर्धशतकी खेळी
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघानं दहा वर्षांपूर्वीचा स्वतःच्याच नावावरील विक्रम मोडला.
वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला.
त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. भारतीय संघानं हा सामना 6 विकेट राखून जिंकला.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग
208 वि. वेस्ट इंडिज, हैदराबाद 2019
207 वि. श्रीलंका, मोहाली, 2009
202 वि. ऑस्ट्रेलिया, राजकोट, 2013
199 वि. इंग्लंड, ब्रिस्टोल, 2018
198 वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2016
ट्वेंटी-20 क्रिकेटमधील विराटची सर्वोत्तम खेळी
94* वि. वेस्ट इंडिज, हैदराबाद, 2019
90* वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड, 2016
89* वि. वेस्ट इंडिज, मुंबई, 2016
82* वि. ऑस्ट्रेलिया, मोहाली, 2016
82 वि. श्रीलंका, कोलंबो, 2017